पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘अमृत भारत रेल्वे स्थानक’ योजनेचे उद्घाटन !

  • देशातील १ सहस्र ३०९ स्थानकांचा पुनर्विकास होणार

  • पहिल्या टप्प्यात ५०८ स्थानके

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘अमृत भारत रेल्वे स्थानक’ योजनेचे उद्घाटन करताना

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६ ऑगस्ट या दिवशी ‘अमृत भारत रेल्वे स्थानक’ योजनेचे उद्घाटन केले. या योजनेच्या अंतर्गत देशभरातील १ सहस्र ३०९ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात ५०८ स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे.

या प्रसंगी बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाल की, या योजनेचा लाभ देशातील सर्व राज्यांना होणार आहे. उत्तरप्रदेशमध्ये अनुमाने ४ सहस्र ५०० कोटी रुपये खर्चून ५५ अमृत स्थानके विकसित केली जाणार आहेत. राजस्थानच्या ५५ रेल्वे स्थानकांचीही पुनर्बांधणी केली जाणार आहे.

उत्तर रेल्वेच्या १४४ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करणार

या योजनेंतर्गत उत्तर रेल्वेच्या १४४ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ७१ रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. देहली विभागातील एकूण ३३ स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे, त्यांपैकी पहिल्या टप्प्यासाठी १४ स्थानकांची निवड करण्यात आली आहे. उत्तर रेल्वेचे महाव्यवस्थापक शोभन चौधरी म्हणाले की, पुढील ३० वर्षांचा विचार करून पुनर्विकास केला जाणार आहे. या योजनेंतर्गत रेल्वे स्थानके शहराचे केंद्र म्हणून विकसित केली जाणार आहेत. यासाठी २४ सहस्र ४७० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.