सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या रथोत्सवाचे सूक्ष्म परीक्षण आणि साधकांना झालेले आध्यात्मिक स्तरावरील लाभ !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाचे ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !
‘३० जुलै २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘महर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी केलेल्या विशिष्ट वेशभूषेमुळे साधकांना वैराग्य, भक्ती अन् ज्ञान यांचा प्रसाद मिळणे आणि साधकांनी रथ ओढून प्रांगणात फिरवणे यामागील जाणवलेली सूत्रे’ ही सूत्रे वाचली. आज त्या पुढील सूत्रे येथे देत आहोत.
५. रथोत्सवातील एकूण क्रम आणि त्याची जाणवलेली काही आध्यात्मिक वैशिष्ट्ये
५ आ. रथोत्सवाची रचना
५ आ १. रथोत्सवात रथाच्या मागे चालणारे साधक व्यष्टी साधनेचे, तर रथाच्या पुढे चालणारे साधक समष्टी साधनेचे प्रतीक असणे : व्यष्टी आणि समष्टी दोन्ही प्रकारच्या साधनेसाठी श्री गुरूंचे मार्गदर्शन मिळणे महत्त्वाचे असते. यामुळे रथोत्सवात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा रथ मध्यभागी होता. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितले आहे, ‘काळानुसार समष्टी साधनेला अधिक महत्त्व आहे’; म्हणून रथाच्या पुढे असणारे साधक समष्टी साधनेचे, तर रथाच्या मागे चालणारे साधक व्यष्टी साधनेचे प्रतीक आहेत.’
५ आ २. रथोत्सवात रथ मध्यभागी असणे, हे तिन्ही गुरूंच्या कुंडलिनीचक्रांचा प्रवास पूर्ण झाल्याचे प्रतीक असणे : हे ‘मोक्षगंगेच्या’ उदाहरणातून समजून घेऊया. भारतात गंगा दक्षिण ते उत्तर वहाणे, हे कुंडलिनी उर्ध्वगामी (मूलाधार ते सहस्रार या मार्गाने जागृत) होण्याचे, म्हणजे व्यष्टी साधनेचे प्रतीक आहे, तर गंगा उत्तर ते दक्षिण वहाणे, हे कुंडलिनीचे पुनरावर्तन (सहस्रार ते मूलाधार या मार्गाने जागृत) होण्याचे, म्हणजे समष्टी साधनेचे प्रतीक आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या कुंडलिनीचक्रांचा मूलाधार ते सहस्रार अन् सहस्रार ते मूलाधार’, असा प्रवास पूर्ण झाल्याचे प्रतीक, म्हणजे रथोत्सवात रथ मध्यभागी असणे
५ इ. रथोत्सवातील साधकांनी एकत्रित आणि मध्यम लयीत केलेले पदसंचालन अन् हस्तसंचालन बघतांना पुष्कळ चैतन्य जाणवून मन निर्विचार होणे : रथोत्सवात सहभागी साधक एकत्रितपणे हातात धरलेले ध्वज मागे-पुढे लहरवणे, डोक्याच्या वर हात नेऊन टाळ वाजवणे अशा विविध कृती म्हणजे अनुक्रमे पदसंचलन आणि हस्तसंचलन करत रथोत्सवात मार्गक्रमण करत होते. या कृतींची संख्या २ ते ३ असून त्यांची गती मध्यम होती. समाजात अशा फेर्यांमध्ये पुष्कळ कृती केल्या जातात आणि त्यांची गती जलद असते. गतीने करण्यात येणारे पदसंचलन आणि हस्तसंचलन यांमुळे रजोगुणात वाढ होऊन सात्त्विकता अल्प होते, तर संथ लयीत केलेल्या पथसंचलनामुळे ईश्वरी शक्ती कार्यरत होत नाही; याउलट साधक मध्यम गतीने करत असलेल्या पथसंचलनामुळे सात्त्विकता कार्यरत होऊन चैतन्य जाणवत होते. साधक करत असलेले पदसंचलन आणि हस्तसंचलन बघतांना माझे मन निर्विचार झाले. मी इतर दर्शकांचे निरीक्षण करतांना माझ्या लक्षात आले, ‘रथोत्सव बघतांना अनेक साधकांचे मन निर्विचार होत असून ते एकाग्रपणे रथोत्सव बघत आहे. ‘ही रथोत्सवातील चैतन्याची अनुभूती आहे’, असे माझ्या लक्षात आले.
५ ई. रथोत्सवातून वायुतत्त्व, आकाशतत्त्व, तसेच भाव आणि चैतन्य यांची स्पंदने सर्वाधिक प्रमाणात जाणवणे : व्यावहारिक जगतात काढण्यात येणार्या फेर्यांमध्ये हस्तसंचलन आणि पदसंचलन सात्त्विक नसते. यामुळे त्यांच्या कृतीतून त्रासदायक (काळी) शक्ती वायूमंडलात पसरून त्यातील तमोगुणात वाढ होते. विशेषतः पदसंचलन करतांना होणार्या हालचालीतून पुष्कळ त्रासदायक सूक्ष्म नाद निर्माण होतो; याउलट साधक भावपूर्णपणे करत असलेल्या हालचालीमुळे रथोत्सवात वायूतत्त्व आणि सकारात्मक सूक्ष्म नाद, म्हणजे आकाशतत्त्व प्रक्षेपित होत होते. त्यामुळे जसजशी रथयात्रा प्रांगणात पुढे पुढे जात होती, तसतशी मला माझ्या पुढच्या पुढच्या (प्रथम मूलाधार, मग स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्रार) कुंडलिनी चक्रांवर शीतलता आणि चांगली स्पंदने जाणवत होती. रथोत्सवातून भाव आणि चैतन्य यांची अनुक्रमे ४० टक्के अन् ३० टक्के एवढ्या प्रमाणात स्पंदने प्रक्षेपित होतांना जाणवत होती.
५ उ. रथोत्सवात साधकांच्या समवेत सूक्ष्मातून विविध लोकांतील जिवांनी सहभागी होणे : रथोत्सव बघतांना मला उच्च सूक्ष्म लोकांतील (स्वर्ग, महर्, जन, तप या लोकांतील) साधना करणार्या सात्त्विक जिवांची उपस्थिती जाणवली. मला सूक्ष्मातून पुढील दृश्य दिसले, ‘काही जीव रथारूढ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या भोवती फेर धरून गरब्यासारखे नृत्य करत होते. जणू रथाच्या जागी श्रीकृष्ण असून त्याच्या भोवती गोपी नृत्य करत आहेत. काही जीव रथयात्रेत सहभागी साधकांसह रथारूढ तिन्ही गुरूंवर पुष्पवर्षा करत होते, तर काही जीव रथयात्रेतील ध्वज आणि टाळ या पथकांतील साधक करत असलेल्या विविध कृतींप्रमाणे कृती करत होते.’ या संदर्भात सूक्ष्मातून माझ्या लक्षात आले, ‘उच्च लोकातील भाव असलेले जीव विविध प्रकारे रथारूढ तिन्ही गुरूंची स्तुती करत आहेत. भक्तीयोगी जीव रथाभोवती नृत्य करून, तर ज्ञानमार्गी जीव पुष्पवर्षा करून स्तुती करत आहेत; याउलट साधनेची तळमळ असलेले जीव प्रत्यक्ष रथोत्सवात सहभागी होऊन सेवेद्वारे आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.’
५ ऊ. ‘रथोत्सवात सहभागी पथकातील साधकांच्या सर्व कृती एकसारख्या होऊन त्यात सहजता आणि भाव जाणवणे’, हे अधिक प्रमाणात समष्टी भाव कार्यरत असण्याचे प्रतीक असणे : रथोत्सवात विविध पथकांमधील साधकांच्या सर्व कृती, उदा. ध्वज घेऊन नृत्य करणे, टाळ वाजवतांना धरलेला ठेका इत्यादी कृती एकसारख्या होत होत्या. व्यावहारिक जगतातही विविध कार्यक्रमांमध्ये परेड, सामूहिक नृत्य इत्यादींमध्ये एकत्रित कृती केली जाते; पण त्यात मन आणि बुद्धी यांची कार्यरतता असल्याने अन् भाव नसल्याने कृत्रिमता जाणवते; याउलट रथोत्सवात साधक करत असलेल्या सर्व कृतींत सहजता आणि भाव जाणवत होता. या संदर्भात ईश्वराने मला सांगितले, ‘परिस्थिती स्वीकारणे; तन, मन, बुद्धी, अहं याचा त्याग करणे आणि आज्ञापालन करणे’, या साधनेतील त्रिसूत्रींचे समष्टीकडून आचरण केले जाते, तेव्हा समष्टी भाव अधिक प्रमाणात कार्यरत होतो. समष्टी भावाचे प्रमाण ३५ टक्क्यांहून अधिक झाल्यास त्या कृतीचे संचलन ईश्वरी शक्ती करू लागते. रथोत्सवातील साधकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ४० टक्के समष्टी भाव कार्यरत झाला होता. त्यामुळे अधिक प्रयत्न न करताही साधकांचे मन आणि बुद्धी त्यांच्या हालचालीशी एकरूप होत होते. फलस्वरूप रथोत्सवाकडे बघून आध्यात्मिक स्तराच्या अनुभूती येत होत्या.
५ ए. रथोत्सवात सेवा करणार्या साधकांची अनेक वर्षांची साधना होऊन त्यांचे आध्यात्मिक त्रास न्यून होणे : रथोत्सवात विविध साधक सहभागी झाले होते. काही साधकांची आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांहून अल्प होती. काहींची आध्यात्मिक पातळी ६१ टक्क्यांहून अधिक होती. काही साधकांना काही प्रमाणात अनिष्ट शक्तींचा त्रास होता. या सर्व साधकांवर पुढील सारणीत दिल्याप्रमाणे परिणाम झाल्याचे लक्षात आले.
५ ऐ. ‘तन, मन, बुद्धी आणि अहं अर्पण करून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेली साधना करणे’, हाच ‘खरा रथोत्सव’ असणे : रथोत्सवाच्या संदर्भात ईश्वराने मला सांगितले, ‘अनेक साधकांच्या मनात ‘आम्हालाही श्री गुरूंच्या रथोत्सवात सहभागी व्हायचे आहे’, असा विचार येत आहे.’ प्रत्यक्षात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी प्रत्येक साधकाला त्यांच्या रथोत्सवात सहभागी होण्याची संधी दिली आहे. स्थुलातील रथोत्सवात श्री गुरूंनी दिलेल्या सेवेच्या संधीतून ते रहस्य उलगडत आहे.
५ ऐ १. देहबुद्धी अर्पण करणे, म्हणजे मंगल कलश धारण करणे : रथोत्सवात सर्वांत पुढे मंगल कलश धरलेल्या सुवासिनी होत्या. त्या देहबुद्धी अर्पणाचे प्रतीक होत्या. डोक्यावर पाण्याने भरलेला कलश धरल्यावर स्वतःचे लक्ष सतत कलशाकडे असते, त्याचप्रमाणे ‘नामजप, सत्संग, सेवा’, असे साधनेचे प्रयत्न करतांना देहबुद्धी आणि ‘स्व (अहं) ला विसरून साधनेशी एकरूप होणे, म्हणजे श्री गुरूंच्या रथयात्रेतील कलश डोक्यावर घेणे आहे.
५ ऐ २. तन अर्पण करणे, म्हणजे ध्वजपथकात सेवा करणे : ध्वजपथक हे तन अपर्णाचे प्रतीक आहे. ध्वजसंचलनासाठी पुष्कळ शारीरिक श्रम घ्यावे लागले. ध्वज हे कीर्ती आणि विजय यांचे प्रतीक आहेत. श्री गुरूंचे अध्यात्मप्रसाराचे कार्य, म्हणजे ध्वज. श्री गुरूंची कीर्ती विश्वभरात करण्यासाठी आणि आळस, न्यूनगंड, पुढाकार न घेणे, प्रतिमा जपणे अशा स्वभावदोषांवर मात करून गुरुकार्यासाठी झोकून देऊन शारीरिक सेवा करणे, म्हणजे श्री गुरूंच्या रथोत्सवातील ध्वजपथकात सेवा करणे.
५ ऐ ३. मनाने निरंतर अनुसंधानात रहाणे, म्हणजे टाळपथकात सेवा करणे : टाळपथक हे मन अर्पण करण्याचे प्रतीक आहे. मन सतत कल्प (चांगले विचार) किंवा विकल्प (नकारात्मक विचार) यांच्या गोंधळाचे नाद करत रहाते. भावाच्या टाळाद्वारे मनाला श्री गुरूंच्या संकीर्तनात गुंतवणे, म्हणजे श्री गुरूंच्या रथोत्सवातील टाळपथकात सेवा करणे.
५ ऐ ४. अहं त्यागून श्री गुरूंचे आज्ञापालन करणे, म्हणजे श्री गुरूंचा रथ ओढणे : रथ ओढणारे साधक हे अहं अर्पण करण्याचे प्रतीक आहे. आपल्याला मिळालेली सेवा छोटी किंवा मोठी याचा विचार न करता, ‘मनानुसार सेवा हवी’, अशी अपेक्षा न ठेवता, आहे ती परिस्थिती स्वीकारून समष्टीच्या सहाय्याने ती पूर्ण करण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करणे, म्हणजे रथोत्सवात श्री गुरूंचा रथ ओढण्याची सेवा करणे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी समष्टी साधना शिकवून प्रत्येक साधकाला त्यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित रथोत्सवाच्या सेवेत सहभागी होण्याची संधी दिली आहे. साधकांनी स्वतःच्या प्रयत्नांमध्ये वाढ करून मिळालेली सेवा स्वीकारून श्री गुरु आपल्या प्रगतीची वाट पहात आहेत.’ (क्रमश: पुढच्या रविवारी)
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(१५.५.२०२३ आणि १६.५.२०२३)
|
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/710405.html