धर्म, धर्मनिरपेक्षता आणि राज्यघटना !
१. भारत स्वयंभू हिंदु राष्ट्र आहेच; पण राज्यघटनेद्वारे ते घोषित होणे आवश्यक !
‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संदर्भात सर्वत्र प्रवास करत असतांना काही जणांचा एक समान प्रश्न असतो, ‘भारत हे हिंदु राष्ट्र आहेच; मग वेगळे घोषित करण्याची काय आवश्यकता आहे ?’ खरोखर हे त्रिकालबाधित सत्य आहे की, भारत हे स्वयंभू हिंदु राष्ट्र आहे ! असे असले, तरी विद्यमान राज्यघटनात्मक व्यवस्थेत त्याला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून दर्जा कुठे आहे ? एखाद्याने डॉक्टरची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर तो स्वाभाविक डॉक्टर असतो; परंतु प्रमाणपत्र घेतल्याविना त्याला ‘डॉक्टर’ म्हणून काम करता येत नाही. त्याचप्रमाणे राज्यघटनेद्वारे भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित केल्याविना आजच्या स्थितीत भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणता येणार नाही. त्यामुळे भावनात्मक विचार करण्यापेक्षा राज्यघटनात्मक हिंदु राष्ट्र घोषित होण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.
२. धर्म, धर्मनिरपेक्षता आणि राज्यघटना
यासाठी आपण सर्वप्रथम काही संज्ञा समजून घेऊ.
राज्यघटनात्मक शब्द म्हणजे काय ? हे प्रथम समजून घेऊया. जो शब्द भारतीय राज्यघटनेत लिहिला गेला आहे, त्याला ‘राज्यघटनात्मक शब्द’ म्हणतात. या नियमानुसार पुढील शब्द राज्यघटनात्मक आहेत.
२ अ. ‘कास्ट’ (जात) : राज्यघटनेत ‘शेड्युल कास्ट’ (अनुसूचित जाती) हा शब्द आला आहे. त्यामुळे जात शब्दाला विरोध करणे, हा राज्यघटनेला विरोध आहे.
२ आ. हिंदु : अलीकडेच कर्नाटकच्या निवडणुकांच्या पूर्वी काँग्रेसचे कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष सतिश जारकीहोळी यांनी ‘हिंदु’ शब्दाचा अर्थ अश्लील असून तो परकीय आहे’, असे विधान केले होते. खरे तर त्यांचे विधान अज्ञानवश आहे. सिंधु नदीपासून ‘हिंदु’ शब्द बनलेला आहे. पाणिनीय व्याकरणानुसार ‘स’चा ‘ह’ उच्चार होतो. जसे ‘सप्ताह’ शब्दाला ‘हफ्ताह’ म्हटले जाते. राज्यघटनेच्या भाषेत सांगायचे, तर ‘हिंदु’ हा शब्द राज्यघटनात्मक आहे. राज्यघटनेतील अनुच्छेद ‘२५ ब’ मध्ये हा शब्द आहे. त्यात ‘शीख, जैन, बौद्ध, लिंगायत हे हिंदू आहेत’, असे स्पष्टीकरणही दिले आहे. या शब्दाच्या राज्यघटनेच्या व्याप्तीनुसार जारकीहोळी यांचे आक्षेपार्ह विधान म्हणजे समस्त हिंदु समाजाचा अपमान आहे. खरे तर यासाठी त्यांच्यावर ‘राज्यघटनाद्रोही’ म्हणून खटले प्रविष्ट करायला हवेत !
२ इ. धर्म : हा शब्द राज्यघटनेत नाही. राज्यघटनाकर्त्यांनी धर्म या शब्दासाठी ‘रिलीजन’ (उपासनापंथ) हा शब्द वापरात आणला आहे. राज्यघटनाकर्त्यांनी ‘धर्म’ आणि ‘रिलीजन’ या शब्दांना एकार्थी मानले, तरी ‘ऑक्सफोर्ड शब्दकोशा’ने हे दोन्ही शब्द वेगळे असल्याचे अर्थ देतांना स्पष्ट केले आहे.
२ इ १. धर्म : ‘युनिव्हर्सल लॉज ऑफ करेक्ट सोशल कंडक्ट इन हिंदुइझम्’ (हिंदु धर्मातील सामाजिक सदाचाराचे वैश्विक नियम.)
२ इ २. रिलीजन : ‘पर्टिक्युलर सिस्टीम ऑफ फेथ अँड वर्शिप’, म्हणजेच ‘विश्वास ठेवण्याची आणि उपासनेची विशिष्ट पद्धत !’
२ ई. सेक्युलर (धर्मनिरपेक्ष) : हा शब्द म्हणजे १९ व्या शतकातील ख्रिस्ती संकल्पना आहे. ‘हा शब्द राज्यघटनेत असू नये’, असे तत्कालीन काँग्रेसचे नेते नेहरू, वल्लभभाई पटेल आणि राज्यघटनाकार डॉ. आंबेडकर यांचे मत असल्याने हा शब्द २६ जानेवारी १९५० या दिवशी बनलेल्या राज्यघटनेचा भाग बनला नाही. थोडक्यात त्या वेळी ‘सेक्युलर’ हा एक अराज्यघटनात्मक शब्द होता. वर्ष १९७६ मध्ये ‘सेक्युलर’ शब्द भारतीय राज्यघटनेमध्ये ४२ व्या सुधारणेच्या अंतर्गत जोडण्यात आला. त्या वेळी आणीबाणी होती. विरोधी पक्षांचे खासदार कारावासात होते. त्या वेळी राममनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन समाजवादी आणि जनसंघवादी आणीबाणीला विरोध करत होते. ही काँग्रेसविरोधी युती तोडण्यासाठी, तसेच समाजवाद्यांना आणि जनसंघाची मतपेटी नसलेल्या अहिंदूंना चुचकारण्यासाठी तत्कालीन इंदिरा गांधी सरकारने ४२ व्या सुधारणेच्या अंतर्गत राज्यघटनेत ‘समाजवादी’ आणि ‘सेक्युलर’ हे शब्द घुसडले. त्या वेळी ‘सेक्युलर’ शब्दाची व्याख्या करण्यात आली नाही. राज्यघटनेत एखादा शब्द घालतांना त्या शब्दाची व्याख्या करणे किंवा व्याप्ती सांगणे आवश्यक असते; कारण त्यानुसार न्यायालये निवाडे देत असतात, विधीमंडळ कायदे बनवत असते आणि प्रशासन त्यासंबंधी कार्यवाही करत असते. दुर्दैवाने आजपर्यंत राज्यघटनेतील ‘सेक्युलर’ शब्दाची कुठलीही व्याख्या करण्यात आलेली नाही. मोरारजी देसाई सरकारने ‘सेक्युलर’चा अर्थ ‘सर्वधर्मसद्भाव’ असा सांगणारे विधेयक प्रस्तुत केले; पण त्या वेळी राज्यसभेत काँग्रेसचे सदस्य अधिक संख्येने होते. त्यांनी याला विरोध केला आणि ‘सेक्युलर’ शब्द पुन्हा व्याख्याहीन राहिला.
३. ‘सेक्युलर’ शब्दाचा अधिकृत अर्थ नसल्याने होत असलेला अनर्थ !
‘सेक्युलर’ शब्दाचा अधिकृत अर्थ राज्यघटनेत परिभाषित नसल्याने लोकशाहीतील चारही स्तंभ मनाप्रमाणे त्याच्या व्याख्या (इंटरप्रिटेशन) करत आहेत आणि एक प्रकारे हिंदु धर्मियांनाच लक्ष्य करत आहेत.
३ अ. शासन : शासन अल्पसंख्यांकांच्या मतांसाठी त्यांच्या हिताचाच विचार करते. ‘सेक्युलॅरिझम’च्या नावाखाली ‘सच्चर आयोग’, ‘अल्पसंख्यांक आयोग’, तसेच ‘वक्फ ॲक्ट’, ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’सारखे हिंदुविरोधी कायदे बनवण्यात आले.
३ आ. प्रशासन (ॲडमिनिस्ट्रेशन) : दंगलींमध्ये अल्पसंख्यांकांनी दंगल घडवली, तरी ‘बॅलन्स’ करण्यासाठी हिंदु नेत्यांना अटक केली जाते. हा सार्वत्रिक प्रशासनीय अनुभव आहे. याविषयी मी विस्तारात जाणार नाही.
३ इ. माध्यमे (मिडिया) : प्रसारमाध्यमे दंगलींमध्ये दंगेखोर अल्पसंख्यांकांचे नाव टाळून ‘एक समूह किंवा गट’ असे संबोधतात. अल्पसंख्यांकांच्या विद्वेषी भाषणांविषयी चर्चा करत नाही. आतंकवाद्यांना पकडल्यानंतर ‘कार्यकर्त्यांना पकडले’, असे लिहितात आणि नेहमीच हिंदूंना दोषी ठरवतात. याविषयी तुम्हा-आम्हा सर्वांना चांगला अनुभव आहे. त्यामुळे त्याविषयी मी अधिक बोलणार नाही.
३ ई. न्यायासन (ज्युडीशिअरी) : ‘सेक्युलर’ (निधर्मी) शब्दाच्या व्याख्येविषयी न्यायपालिकेमध्ये प्रचंड गोंधळ आहे. याचे एक उदाहरण सांगतो. केंद्र सरकारद्वारे संचालित विद्यालयांना ‘केंद्रीय विद्यालय’ म्हणतात. या केंद्रीय विद्यालयात प्रतिदिन ‘असतो मा सद्गमय । तमसो मा ज्योतिर्गमय । मृत्योर्मा अमृतं गमय ।।’ (पवमान मंत्र, बृहदाकारण्य उपनिषद) (अर्थ : हे ईश्वरा, मला असत्याकडून सत्याकडे, अंधकारातून प्रकाशाकडे आणि मृत्यूपासून अमरत्वाकडे घेऊन जा) ही प्रार्थना म्हटली जाते. वर्ष २०१८ मध्ये या प्रार्थनेच्या विरोधात देशाच्या सर्वाेच्च न्यायालयात जनहित याचिका झाली. याचिककर्त्याचे म्हणणे होते की, ही प्रार्थना हिंदु भाषेत असून ती हिंदु श्रद्धेशी संबंधित आहे. त्यामुळे ती ‘सेक्युलॅरीझम’च्या विरोधात आहे. खरे तर यात कुठल्याही हिंदु देवतेला प्रार्थना नसल्याने सर्वाेच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळायला हवी होती; परंतु दुर्दैवाने ती प्रविष्ट करून घेतली, म्हणजे एक प्रकारे हे ‘नॅरेटिव्ह’ (कपोलकल्पित लिखाण) मान्य केले.
३ ई १. भाषा कधी ‘सेक्युलर’ असते का ? याचिकाकर्त्याने संस्कृतला हिंदु श्रद्धेशी संबंधित भाषा म्हटले आणि ती ‘सेक्युलॅरिझम’च्या विरोधात असल्याचे म्हटले. न्यायालयाने ही याचिका मान्य केली, म्हणजे तत्त्वतः मान्य केले की, संस्कृत भाषा बोलणे, हे ‘सेक्युलॅरिझम’च्या विरुद्ध आहे.
३ ई २. ‘असतो मा सद्गमय…’ या तीन ओळींच्या प्रार्थनेत हिंदु श्रद्धा कुठे आहे ? ‘असत्याकडून सत्याकडे जा’, ‘अंधकारापासून प्रकाशाकडे जा’, ‘मृत्यूकडून अमरत्वाकडे जा’, असे म्हणणे, ही तर विश्वकल्याणाची शिकवण आहे. त्यात कुठेही हिंदु धर्म, देवता, तत्त्वज्ञान, श्रद्धा आदी नाही. दुसरी गोष्ट म्हणजे या देशात हिंदु श्रद्धेशी संबंधित प्रार्थना करणे, हे ‘सेक्युलॅरिझम’च्या विरोधात आहे, हे एक प्रकारे न्यायालयाने मान्य केले आहे.
३ ई ३. एवढेच नाही, भविष्यात याविषयी भिन्न अर्थ (इंटरप्रिटेशन) निघू शकतील, उदाहरणार्थ,
– ‘सेक्युलॅरिझम’ म्हणजे संस्कृत भाषेला विरोध आणि इंग्रजी भाषेचा स्वीकार
– ‘सेक्युलॅरिझम’ म्हणजे हिंदु प्रार्थनांना विरोध आणि ख्रिस्ती ‘प्रेयर’चा स्वीकार
– ‘सेक्युलॅरिझम’ म्हणजे भारतीय दर्शनशास्त्राला विरोध
– ‘सेक्युलॅरिझम’ म्हणजे सत्याकडे जाण्यास विरोध
– ‘सेक्युलॅरिझम’ म्हणजे ज्ञानप्रकाशाकडे जाण्यास आणि अमरत्वाकडे जाण्याच्या दर्शनशास्त्राला विरोध. असे नवीन अर्थ या याचिकेच्या आधारे काढले जातील !’
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था (२५.५.२०२३)