३ वर्षांत भारत-चीन सीमेवरील ६० टक्के भागांत रस्त्यांची निर्मिती पूर्ण ! – अजय भट्ट, संरक्षण राज्यमंत्री
नवी देहली – सीमेवर चीनच्या वाढत्या आक्रमक कारवाया पहाता भारताने गेल्या ३ वर्षांमध्ये रस्तेबांधणीसाठी गतीशील प्रयत्न केले. सीमेवर मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे जाळे विणण्यात आले आहे. यामुळे सीमेवर सैनिकांची वाहतूक सोपी आणि सुरक्षित होत चालली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणार्या बी.आर्.ओ. म्हणजेच सीमा रस्ते संघटनेने चीनच्या सीमेवर एकूण ६० टक्के भागात रस्ते बांधले आहेत. गेल्या ३ वर्षांत भारत-चीन अथवा भारत-पाक या सीमांवर एकूण २ सहस्र ४४५.५४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची निर्मिती करण्यात आली, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी संसदेत दिली.
१. लिखित उत्तरात भट्ट यांनी सांगितले, ‘अरुणाचल प्रदेशात आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे ५०७.१४ किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्यात आले आहेत. यानंतर लडाख ४५३.५९ किलोमीटर, उत्तराखंड ३४३.५६ किलोमीटर, सिक्कीम १६४.९५ किलोमीटर, तर हिमाचल प्रदेशात भारत-चीन सीमेवर ४०.२३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची निर्मिती गेल्या ३ वर्षांत करण्यात आली आहे.’
२. भट्ट पुढे म्हणाले की, पाकला लागून असलेल्या सीमेवरही गेल्या ३ वर्षांत मोठ्या प्रमाणात रस्ते उभारणी करण्यात आली. यांतर्गत जम्मू-काश्मीरमध्ये ४४३.९४ किलोमीटर, तर राजस्थानमध्ये ३११.१४ किलोमीटर रस्त्यांची उभारणी करण्यात आली.
३. जून २०२० मध्ये चीनने तिबेटमध्ये असलेल्या डोकलाम या ठिकाणी भारतीय सीमेत घुसून आक्रमण केले होते. त्या वेळी भारतीय सैनिकांनी त्यास चोख प्रत्युत्तर देत साधारण १०० चिनी सैनिकांना ठार केले होते. त्यानंतर भारताने संरक्षणाच्या अंतर्गत कठोर भूमिका घेत पाक आणि चीन यांच्या सीमांवर मोठ्या प्रमाणात रस्त्यांच्या निर्मितीस आरंभ केला. यांत केवळ रस्तेच नव्हे, तर पूल, सैनिकांसाठी निवास आणि बोगदे यांचीही सीमावर्ती भागात निर्मिती करण्यात आली आहे. यासाठी २०२२-२३ या आर्थिक वर्षात बी.आर्.ओ. ला ९२३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.