यशस्वी जीवनासाठी सात्त्विक जीवनशैली आवश्यक ! – शॉन क्लार्क, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने जयपूर (राजस्थान) येथील ‘सी-२०’ परिषदेत आध्यात्मिक संशोधन सादर !
जयपूर (राजस्थान) – ‘सी-२०’ परिषदेच्या ‘विविधता, समावेशकता आणि परस्पर आदर’ या कार्यकारी गटामध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण मिळाल्यावर आनंद झाला; कारण महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे ‘अध्यात्म संशोधन केंद्र’ हे वरील ३ सूत्रांचे प्रत्यक्ष मूर्तीमंत उदाहरण आहे. यशस्वी जीवनासाठी आपण सात्त्विक जीवनशैली अंगीकारणे आवश्यक आहे, तसेच आध्यात्मिक स्तरावरील नकारात्मकता दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करायला हवेत. हे सूत्र सर्व संस्कृतींना लागू असून समाजामध्ये एकात्मता आणण्याच्या दृष्टीने सयुक्तिक आहे, असे उद्गार ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या संशोधन गटाचे सदस्य श्री. शॉन क्लार्क (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) यांनी काढले. नुकतेच जयपूर (राजस्थान) येथे झालेल्या ‘सी-२०’ परिषदेत श्री. क्लार्क बोलत होते. यंदाच्या वर्षी भारताकडे ‘जी-२०’ परिषदेचे यजमानपद आहे. ‘सी-२०’ ही ‘जी-२०’ परिषदेची नागरी शाखा आहे.
पुढे श्री. शॉन क्लार्क यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑरा’ आणि ‘एनर्जी स्कॅनर’ आदी उपकरणे वापरून चालू असलेल्या अनोख्या आध्यात्मिक संशोधनाविषयी सविस्तर माहिती दिली. ‘एखाद्या व्यक्तीच्या प्रभावळीमध्ये नकारात्मक ऊर्जा असणे, हे तिला शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक स्तरावर समस्या निर्माण करते. हे समजावण्यासाठी दैनंदिन जीवनातील आहार, संगीत, चित्रपट, अलंकार इत्यादी सर्वसामान्य सूत्रे व्यक्तीच्या प्रभावळीवर कशा प्रकारे सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम करतात’, या संदर्भातील विविध आध्यात्मिक संशोधनात्मक प्रयोग श्री. क्लार्क यांनी सादर केले.
उदाहरणादाखल भयपट (हॉरर फिल्म) पहाण्याचा प्रेक्षकावर ऊर्जेच्या स्तरावर होणार्या परिणामाचा अभ्यास करण्यासाठी १७ व्यक्तींवर प्रयोग करण्यात आला. चित्रपट पहाण्याआधी आणि त्यानंतर त्यांच्या ऊर्जेच्या स्तरावरील स्थितीचा ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ आणि ‘गॅस डिस्चार्ज व्हिज्वलायजेशन’ ही दोन वैज्ञानिक उपकरणे, तसेच सूक्ष्म परीक्षण यांद्वारे अभ्यास करण्यात आला.
१७ पैकी ज्यांमध्ये चित्रपट पहाण्यापूर्वी सकारात्मक ऊर्जा होती, ती चित्रपट पाहिल्यानंतर किमान ६० टक्के न्यून झाली. काहींमध्ये तर ती पूर्णतः नष्ट झाली, तसेच पहाणार्या सर्वांमध्ये नकारात्मक ऊर्जा १०७ टक्के वाढली आणि दुसर्या दिवशीही ती ५५ टक्के एवढी राहिली होती. यावरून भयपट पाहिल्याने स्वतःच्या प्रभावळीवर कसा भयावह प्रतिकूल परिणाम होतो ? हे स्पष्ट होते.
‘सद्यःस्थितीत सर्वत्र मोठ्या प्रमाणावर असे आध्यात्मिक स्तरावरील प्रदूषण वाढले आहे. यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी काय सात्त्विक आणि काय असात्त्विक आहे ? हे जाणून घेऊन जिथे शक्य असेल तिथे असात्त्विक पर्याय टाळणे आवश्यक आहे; परंतु प्रत्येक वेळी हे शक्य असेलच असेही नाही. त्यामुळे आजच्या प्रामुख्याने असात्त्विक जगामध्ये आपले रक्षण व्हावे, तसेच आपल्याला यशस्वी आणि आनंदी जीवन जगता यावे, यासाठी आपल्या धर्मानुसार सांगितलेला नामजप करणे, हा एक उत्तम उपाय आहे’, असे श्री. क्लार्क यांनी समारोप करतांना सांगितले.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले लिखित आणि आध्यात्मिक संशोधनावर आधारित ३ शोधनिबंध जुलै २०२३ या मासामध्ये वैज्ञानिक परिषदांमध्ये सादर
वरील शोधनिबंधांचे सहलेखक ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शॉन क्लार्क (महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन गटाचे मुख्य सदस्य) आहेत. ऑक्टोबर २०१६ ते जुलै २०२३ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने १८ राष्ट्रीय आणि ९० आंतरराष्ट्रीय, अशा एकूण १०८ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी १३ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ‘सर्वाेत्कृष्ट सादरीकरण’ पुरस्कार मिळाले आहेत.