सकारात्मक मनोवृत्तीच्या निर्मितीसाठी ‘संस्कृत स्तोत्र पठण वर्गा’ला होणार प्रारंभ
चिपळूण येथील डी.बी.जे. महाविद्यालयाचा नाविन्यपूर्ण उपक्रम !
चिपळूण, ५ ऑगस्ट (वार्ता.) – शहरातील डी.बी.जे. महाविद्यालयातील कौशल्य सिंधू आणि भाषा अध्ययन केंद्राच्या वतीने ‘संस्कृत स्तोत्र पठण वर्ग’ चालू करण्यात येत आहेत. शब्द उच्चारणात सुधारणा व्हावी, संस्कृतमधील श्लोक, मंत्र, ग्रंथ यांचे आत्मविश्वासाने पठण करता यावे, मंत्रशक्तीने आपल्या शरीर आणि मन यांवर होणार्या सकारात्मक पालटांचा लाभ आपणास मिळावा, सकारात्मक मनोवृत्ती निर्माण व्हावी, या उद्देशाने या वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाचा प्रारंभ १८ ऑगस्ट या दिवशी ‘दुर्गा सप्तशती’ या ग्रंथाच्या पठणापासून करण्यात येणार आहे. या वर्गाचा कालावधी १५ आठवड्यांचा असेल. त्यानंतर विविध ग्रंथांचे पठण करण्यासाठी आणखी वर्ग आयोजित करण्यात येतील. हे वर्ग शुक्रवार आणि मंगळवार असे आठवड्यातून २ दिवस डी.बी.जे. महाविद्यालयात वर्ग होणार आहेत.
या वर्गात पूर्णत: सहभागी होणार्यांना डी.बी.जे. महाविद्यालयाच्या कौशल्यसिंधू आणि भाषा अध्ययन केंद्र विभागाकडून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ‘दुर्गा सप्तशती’ पठण शिकण्यासाठी नाममात्र शुल्क रु. ५०० आकारले आहे. वर्गात प्रवेश घेण्यासाठीची पात्रता इयत्ता आठवी पास असणे अपेक्षित असून याला वयाचे बंधन नाही. या वर्गात सहभागी होण्यासाठी ११ ऑगस्टपर्यंत नोंदणी करावी. तालुक्यातील सर्व विद्यार्थी, नागरिक, स्त्री-पुरुष यांनी या वर्गाचा लाभ घ्यावा, असे आवाहन न.ए. सोसायटीचे चेअरमन श्री. मंगेश तांबे आणि डी.बी.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट यांनी केले आहे.
नावनोंदणीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा – प्रा. डॉ. माधवी जोशी ९९७५१६५८४२ प्रा. सोनाली खर्चे ८०८०७११५१३ |