पाद्री पेरेरा यांच्या विरोधात गोव्यात दुसर्या दिवशीही तक्रार प्रविष्ट : मोर्चा, सभा आणि पत्रकार परिषद यांच्या माध्यमातून जनक्षोभ चालूच !
पाद्री बोलमॅक्स पेरेरा यांनी चर्चमधील प्रार्थनेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारे विधान केल्याचे प्रकरण
|
पणजी, ४ ऑगस्ट (वार्ता.) – चिखली येथील ‘एस्.एफ्.एक्स्.’ चर्चचे पाद्री बोलमॅक्स पेरेरा यांनी चर्चमध्ये प्रार्थनेच्या वेळी समस्त हिंदूंचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारे आणि २ धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारे विधान केले. या विधानाचे चलचित्र (व्हिडिओ) सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाल्यानंतर याचे तीव्र पडसाद समाजात उमटले. ३ ऑगस्ट या दिवशी पाद्री पेरेरा यांच्या विरोधात गोव्यात ठिकठिकाणच्या पोलीस ठाण्यात तक्रारी प्रविष्ट करण्यात आल्यानंतर ४ ऑगस्ट या दिवशीही हा जनक्षोभ चालूच होता. पाद्री पेरेरा यांच्या विरोधात ४ ऑगस्टला म्हापसा येथे ‘स्वराज्य गोमंतक’ या संस्थेच्या वतीने तक्रार नोंदवण्यात आली आणि संघटनेने पुढे पत्रकार परिषद घेऊन पाद्री पेरेरा यांचा निषेध केला. वास्को येथे ‘पाद्री पेरेरा यांना कह्यात घ्यावे’, या मागणीला अनुसरून गोव्यातील समस्त शिवप्रेमींनी जाहीर सभा घेतली. सामाजिक माध्यमांवर अनेकांनी पाद्री पेरेरा यांचा संपर्क क्रमांक प्रसारित करून त्यांच्याकडे निषेध नोंदवण्याची मोहीम राबवली. पाद्री पेरेरा यांनी केलेल्या विधानावरून राज्यातील शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने ४ ऑगस्टला वास्को पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढला आणि पाद्री पेरेरा यांना अटक करण्याची जोरदार मागणी केली.
हिंदु धर्माचे रक्षण करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवतच ! – समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई
पाद्री पेरेरा यांनी हिंदूंनी कोणत्या देवाची पूजा करायची ? हे सांगायची आवश्यकता नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी संपूर्ण भारतात हिंदूंचे धर्मांतर केले जात असतांना, मंदिरे तोडली जात असतांना परकीय शक्तींच्या विरोधात यशस्वीपणे लढा देऊन हिंदु धर्माचे रक्षण केले आहे. विधानसभेत नुकत्याच एका पक्षाच्या आमदाराने सरकारी खर्चाने शिवजयंती साजरी करण्यास आक्षेप घेतला होता. त्या वेळी त्या आमदाराला ‘तुला हिंदु धर्माविषयी बोलण्याचा अधिकार नाही’, असे विधानसभेतच सुनावले होते. संबंधित आमदाराने अजूनही याविषयी क्षमा न मागितल्याने आता इतर ठिकाणी धर्मांध लोक धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याचा आम्ही निषेध करतो. धार्मिक भावना जाणूनबुजून दुखावल्याने पाद्री पेरेरा यांनी सर्वांची क्षमा मागावी.
शिवाजी महाराज आमचे दैवतच; टीका करणार्यांना त्यांची जागा आपोआप दिसेल ! – वीजमंत्री सुदिन ढवळीकर
पाद्री बोलमॅक्स पेरेरा यांच्या विधानाचा मी कडाडून निषेध करतो. छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी देव आहेत आणि त्यांच्याबद्दल वाईट विधान करणार्यांना त्यांची जागा आपोआप दिसेल.
धार्मिक व्यासपिठावर देवाविषयी माहिती सांगण्याऐवजी त्याचा दुरुपयोग करणार्या व्यक्तींच्या उद्देशाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होते ! – वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो
पाद्री बोलमॅक्स पेरेरा यांच्या विधानाविषयी मी आक्षेप नोंदवतो. प्रत्येकाने सार्वजनिक ठिकाणी बोलतांना भान ठेवणे आवश्यक आहे. विशेषत: चर्चमधून बोलतांना अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. जे काही घडले ते खरोखर वाईट आहे. काही व्यक्ती धार्मिक व्यासपिठावर देवाविषयी माहिती सांगण्याऐवजी त्याचा दुरुपयोग करत आहे आणि अशा व्यक्तींच्या उद्देशाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होते.
रात्री उशिरा पाद्री पेरेरा यांनी सार्वजनिकरित्या मागितली माफी
(म्हणे) ‘आपल्या विधानाचा विपर्यास केला !’
राज्यभर विरोधात अनेक तक्रारी प्रविष्ट झाल्यानंतर ३ ऑगस्ट या दिवशी रात्री उशिरा पाद्री पेरेरा यांनी सामाजिक माध्यमांवर सार्वजनिकरित्या माफी मागितली. पाद्री पेरेरा यामध्ये म्हणतात, ‘‘माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. मी छत्रपती शिवाजी महाराज यांची राष्ट्रीय पुरुष असल्याची माहिती प्रार्थनेत दिली; मात्र माझे छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव करणारे विधान वगळून केवळ निवडक विधान सामाजिक माध्यमावर प्रसारित करण्यात आले. माझ्या विधानामुळे एखादी व्यक्ती किंवा संघटना यांच्या भावना दुखावल्या असतील, तर मी मनापासून क्षमा मागतो’’.
(सौजन्य : In Goa 24×7)
विरोधकांचा केवळ ‘मणीपूर’विषयी पुळका, तर पाद्री पेरेरा यांच्या विधानावर कोणतेही भाष्य नाही !विधानसभेत मणीपूरमधील हिंसाचाराचा विषय चालू असतांना विरोधी पक्षाचे नेते युरी आलेमाव यांनी पाद्री पेरेरा यांच्याविषयी बोलण्याचे टाळले आणि केवळ मणीपूर हिंसाचाराचे सूत्र लावून धरले. यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांना संबोधून म्हणाले, ‘‘शिवाजी महाराज आम्हाला देवासारखे आहेत; म्हणून मला हे सूत्र महत्त्वाचे वाटते, तुम्हाला ते वाटत नसावे.’’ विरोधी गटातील ‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई यांनी पाद्री पेरेरा यांच्या विरोधात जनक्षोभ उसळलेला असतांना नागरिकांनी चर्चा करून सूत्र सोडवण्याचा सल्ला दिला. |
सविस्तर वृत्त वाचा –
♦ *पाद्री पेरेरा यांच्या विरोधात गोव्यात ४ तक्रारी : कारवाईची मागणी*
https://sanatanprabhat.org/marathi/707826.html
♦ स्वराज्यकर्ता ‘देवतुल्य’च !
संपादकीय
https://sanatanprabhat.org/marathi/707966.html