आरोपीला अटक करून त्वरित कठोर कारवाई करा !
|
चिपळूण, ४ ऑगस्ट (वार्ता.) – नीलिमा सुधाकर चव्हाण या दापोली येथील ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या शाखेत कार्यरत होत्या. २९ जुलै २०२३ या दिवशी नीलिमा दापोलीहून चिपळूण तालुक्यातील ओमळी येथे घरी येण्यास निघाल्या. प्रवासा दरम्यान त्या बेपत्ता झाल्या होत्या. दोन दिवस त्यांचा पत्ता लागला नव्हता आणि १ ऑगस्ट या दिवशी दाभोळ खाडीत संपूर्ण केस काढलेला आणि चेहरा विद्रूप केलेल्या भयानक परिस्थितीत त्यांचा मृतदेह आढळला होता. या वेळी संबंधित आरोपीचा शोध घेऊन अटक करण्याचे आश्वासन पोलिसांकडून मिळाल्यानंतरच नीलिमा चव्हाण यांच्या कुटुंबियांनी मृतदेह कह्यात घेतला होता.
चिपळूण येथेही चव्हाण यांच्या समाजबांधवांनी आणि विविध सर्वपक्षीय नागरिकांनी चिपळूण पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. या संशयास्पद मृत्यूमुळे येथील राजकीय पक्ष आणि विद्यार्थ्यांनी पोलिसांना निवेदन देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक अन्वेषणात नीलिमा चव्हाण ‘सीसीटीव्ही’च्या माध्यमातून दापोली आणि खेड एस्.टी. स्टँड परिसरात दिसल्या होत्या. त्यांच्या भ्रमणभाषचे शेवटचे ‘लोकेशन’ २९ जुलैच्या रात्री १२.०५ वाजता आंजणी रेल्वेस्थानक दाखवले होते. पोलीस या प्रकरणात अधिक अन्वेषण करत आहे.
नीलिमा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी करावी !
भाजपची पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी
चिपळूण – येथील भारतीय जनता पक्षाच्या वतीने ‘नीलिमा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी करून संबंधित आरोपीला लवकरात लवकर पकडून त्याला जामीन मिळणार नाही, अशी कलमे लावण्यात यावीत’, असे निवेदन पोलीस प्रशासनाला देण्यात आले. हे निवेदन इ-मेलद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनाही पाठवण्यात आले आहे.
निवेदन देते वेळी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा आम्रपाली साळवी, प्रदेश सचिव शिल्पा मराठे, तालुका अध्यक्ष वसंत ताम्हणकर, शहराध्यक्ष आशिष खातू आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
चिपळूण येथे मनसेच्या वतीने आणि दापोली येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पोलिसांना संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले. |
आरोपीला अटक करून कठोर शिक्षा द्या ! – महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे निवेदन
चिपळूण – नीलिमा चव्हाण हिचा मृत्यू घातपाताने झाल्याच्या संशयाच्या पार्श्वभूमीवर ‘पोलिसांनी आरोपीला अटक करावी आणि कठोर शिक्षा द्यावी’, या मागणीसाठी शहरातील महाविद्यालयीन युवक आणि युवतींनी येथील पोलीस ठाण्यावर धडक देऊन उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांना निवेदन दिले. डी.बी.जे. रिगल कॉलेज, गुरुकुल कॉलेज आणि अन्य महाविद्यालयांतील विद्यार्थी एकवटले आणि त्यांनी हे निवेदन दिले.
नीलिमा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी होणार ! – उपमुख्यमंत्री अजित पवार
चिपळूण तालुक्यातील ओमळी गावातील नीलिमा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्यूची वस्तूनिष्ठ चौकशी करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिले. याविषयी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहाचे लक्ष वेधले होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारने नोंद घेण्याचे आदेश दिले.
१२ ऑगस्टपर्यंत अन्वेषण न झाल्यास १५ ऑगस्टपासून आमरण उपोषण
रत्नागिरी जिल्हा नाभिक समाजाची चेतावणी !
रत्नागिरी – नीलिमा चव्हाण हिची नेमकी हत्या कोणत्या कारणास्तव झाली, याचे ठोस कारण अद्याप समोर आलेले नाही; मात्र बदल्याच्या भावनेतून तिच्यासमवेत हे कृत्य झाल्याचा संशय आहे. या प्रकरणावरून जिल्हा नाभिक समाज आक्रमक झाला आहे. ‘या प्रकरणाचा वरिष्ठ यंत्रणांच्या माध्यमातून कसून तपास करावा आणि चव्हाण कुटुंबियांना न्याय मिळून द्यावा’, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या घटनेचा १२ ऑगस्टपर्यंत तपास न झाल्यास १५ ऑगस्टपासून आमरण उपोषणास बसण्याची चेतावणी नाभिक समाजाने दिला आहे.