ज्ञानवापीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाला प्रारंभ !
|
वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील ज्ञानवापी परिसराच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाला ४ ऑगस्टला सकाळी ७.४५ वाजल्यापासून प्रारंभ करण्यात आला. दुपारी १२ पर्यंत सर्वेक्षण केल्यानंतर दुपारच्या नमाजापुळे ते थांबवण्यात आले. दुपारी ३ वाजेनंतर सायंकाळी ५ वाजेपर्यंत पुन्हा सर्वेक्षण करण्यात आले. पुढील काही दिवस हे सर्वेक्षण चालू रहाणार आहे. अलाहाबाद उच्च न्यायायालयाने ३ ऑगस्ट या दिवशी सर्वेक्षणाला अनुमती दिल्यानंतर हे सर्वेक्षण पुरातत्व विभागाकडून चालू करण्यात आले.
१. ज्ञानवापी परिसर ४ भागांमध्ये (ब्लॉकमध्ये) विभागलेला आहे. सर्वत्र कॅमेरे बसवण्यात आले आहेत. संपूर्ण परिसराचे चित्रीकरण करण्यात येत आहे. येथील वजू खाना (नमाजापूर्वी हात आणि पाय धुण्याची जागा) वगळून सर्व परिसराचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ज्ञानवापीच्या पश्चिमेकडील भिंतीकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
२. सर्वेक्षणासाठी पुरातत्व विभागाचे ६१ सदस्य सहभागी झाले आहेत. या वेळी हिंदु पक्षाचे प्रतिनिधीही उपस्थित होते. सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
कसे केले जात आहे वैज्ञानिक सर्वेक्षण ?१. कोणतेही खोदकाम न करता रेडिओ तरंगांच्या साहाय्याने भूमी आणि भिंती यांच्या आत काय आहे ? हे जाणून घेतले जात आहे. २. ‘कार्बन डेटिंग पद्धती’ने (वास्तू किती जुनी आहे, हे तपासण्याच्या पद्धतीने) वास्तूची तपासणी केली जात आहे. ३. भिंती, ज्ञानवापीचा पाया आणि येथील मातीच्या रंगातील पालट, यांची तपासणी केली जात आहे. |