साधकांनो, ‘मनमोकळेपणाने न बोलणे’ या स्वभावदोषामुळे होणारी साधनेतील हानी जाणा आणि मनमोकळेपणाने बोलून साधनेतील आनंद घ्या !
‘काही साधक स्वतःच्या मनाची नकारात्मक स्थिती, साधनेत येणार्या अडचणी आणि निराशेचे विचार इत्यादी मनमोकळेपणाने न बोलता मनातच ठेवतात. त्यामुळे त्यांच्या मनावर ताण येतो, त्यांच्या मनातील नकारात्मक विचार वाढतात आणि त्यांना साधनेतील आनंद घेता येत नाही. हे साधक साधना आणि सेवा यांसंदर्भातील उपक्रम, उदा. सत्संग, अभ्यासवर्ग, शिबिरे इत्यादी वेळी निराश असतात अन् त्यातील आनंदही अनुभवत नाहीत. सण आणि उत्सव साजरे करतांनाही त्यांच्यामध्ये ती निराशा जाणवते. उपक्रम किंवा सण झाल्यानंतर त्यांना जाणीव होते की, आपण आनंदी रहाण्याची संधी गमावली. यामागे काही प्रमाणात अनिष्ट शक्तींचे त्रासही कारणीभूत असतात.
‘मनमोकळेपणाने न बोलणे’ या स्वभावदोषामुळे एका साधकाची साधनेची काही वर्षे वाया गेली. या उदाहरणावरून ‘या स्वभावदोषामुळे साधकांच्या साधनेची किती मोठ्या प्रमाणावर हानी होते ?’, हे लक्षात येते. यावर उपाय म्हणजे साधकांनी त्यांच्या मनाची नकारात्मक स्थिती, साधनेत येणार्या अडचणी आणि निराशेचे विचार तत्परतेने संत किंवा उत्तरदायी साधक यांना मनमोकळेपणे सांगावेत. त्यामुळे मनावरचा ताण लवकर न्यून होतो. संत किंवा उत्तरदायी साधक यांनी सांगितलेले नामजपादी उपाय सातत्याने करावेत. ‘स्वतःभोवतालचे अनिष्ट शक्तीचे आवरण काढणे, प्रार्थना करणे आणि कृतज्ञताभावात रहाणे’, यांमुळे नकारात्मक स्थितीतून लवकर बाहेर पडता येईल आणि साधनेचा अमूल्य वेळ वाया जाणार नाही; परिणामी प्रत्येक क्षणी उत्साही राहून कोणताही उपक्रम किंवा सण यांमधून आनंद घेता येईल.’
– (सद़्गुरु) नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था. (२.८.२०२३)