चित्रीकरणातील कृती प्रशिक्षणाचा भाग नाही ! – एन्.सी.सी.
ठाणे येथे एन्.सी.सी.च्या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याचे प्रकरण – मारहाण करणारा विद्यार्थी निलंबित
ठाणे, ४ ऑगस्ट (वार्ता.) – येथील जोशी बेडेकर महाविद्यालयात एन्.सी.सी.च्या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याची घटना ३ ऑगस्टला एका चित्रीकरणातून उघडकीस आली होती. यानंतर विद्यार्थी आणि पालक भयभीत झाले होते. या प्रकरणी एन्.सी.सी.ने निवेदन जारी केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मारहाणीची कृती अत्यंत निंदनीय आहे. हा कोणत्याही एन्.सी.सी. प्रशिक्षणाचा भाग नाही. मारहाण करणार्या विद्यार्थ्याला महाविद्यालयाने निलंबित केले आहे.
विविध राजकीय पक्षांकडून महाविद्यालयाबाहेर आंदोलन करून गुन्हा नोंदवण्याची मागणी !
या घटनेच्या तीव्र प्रतिक्रिया ४ ऑगस्टला ठाणे येथे उमटल्या. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस आणि मनसे या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी महाविद्यालयाबाहेर आंदोलन केले. ‘आंदोलनानंतर संबंधितांवर कारवाई करावी, गुन्हा नोंद करून कठोर कारवाई करावी’, अशी मागणी करण्यात आली आहे. दिवसभर आंदोलन झाल्याने महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला छावणीचे स्वरूप आले होते.