हिंदु विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांत धर्मपालन करण्यापासून रोखू नये !
‘हिंदु एकता आंदोलना’च्या वतीने शिक्षण उपसंचालकांना निवेदन
कोल्हापूर, ४ ऑगस्ट (वार्ता.) – येथील संभाजीनगर परिसरातील इंग्रजी माध्यमातील शाळेत मुलांना टिळा लावण्यास बंदी केली जाते. ताराबाई पार्क येथील मराठी शाळेतही असे प्रकार चालू आहेत. महाविद्यालयातही मुली हिजाब घालतात; पण हिंदु मुलांना भगवे स्कार्फ (पट्टी) घालण्यास विरोध केला जातो. इचलकरंजीत भगवी टोपी घालून येणार्या विद्यार्थ्यांना एका महाविद्यालयात प्रवेश देण्यात आला नाही. शिक्षण घेणार्या हिंदु विद्यार्थी-विद्यार्थिनी यांना त्यांच्या धार्मिक प्रथा, परंपरा, रहाणीमान जपण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे हिंदु विद्यार्थ्यांना धर्मपालन करण्यापासून रोखू नये. पुन्हा अशा घटना घडल्यास ‘हिंदु एकता आंदोलन’ आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना एकत्रितपणे आंदोलन उभे करतील, अशा मागणीचे निवेदन शिक्षण उपसंचालक महेश चौथे यांना देण्यात आले.
या वेळी हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, हिंदु महासभेचे श्री. मनोहर सोरप, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. आशिष लोखंडे यांसह अन्य उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की,
१. झारखंड मधील धनबाद येथे ‘सेंट झेव्हियर कॉन्व्हेंट स्कूल’मध्ये इयत्ता १० वीत शिकणार्या हिंदु मुलीला टिकली लावल्याच्या कारणावरून शिक्षिकेने अपमानित करत थोबाडीत मारली. हा प्रकार कोवळ्या वयाच्या मुलीच्या मनावर गंभीर आघात करून गेला. या मुलीला अपमान सहन न झाल्याने तिने घरी येऊन गळफास लाऊन आत्महत्या केली. अशा घटना म्हणजे भारतीय हिंदु संस्कृतीवर आक्रमणच आहे.
२. वास्तविक शाळा-महाविद्यालय येथे विद्यालयाचा पोषाख (ड्रेस कोड) घालणे आवश्यक आहे. असे असतांना तेथे बुरखा, हिजाबला अनुमती देण्यात येते. ज्यांना धार्मिक वेशभूषा करायची असेल, त्यांनी ती शाळेबाहेर करावी. तरी यापुढे शाळा-महाविद्यालयात हिजाब-बुरखा बंदी करावी. या सर्व गोष्टींकडे शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांनी तातडीने लक्ष घालावे.