अखंड हिंदु राष्ट्रासाठी सातत्याने सेवार्थ रहाणे हीच स्व. अधिवक्ता गोविंदजी गांधी यांना खरी श्रद्धांजली ! – अधिवक्ता दत्तात्रय सणस
सातारा, ४ ऑगस्ट (वार्ता.) – क्रांतीकारकांचे शिरोमणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अखंड हिंदु राष्ट्र साकारण्यासाठी चालू केलेल्या राष्ट्रयज्ञामध्ये स्वतःच्या प्राणांची आहुती देणारे अखिल भारतीय हिंदु महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष स्व. अधिवक्ता गोविंद गांधी यांचे आज द्वितीय पुण्यस्मरण आहे. स्व. अधिवक्ता गोविंदजी गांधी यांनी पाहिलेले अखंड हिंदु राष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी सातत्याने सेवारत रहाणे, हीच स्व. अधिवक्ता गोविंदजी गांधी यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन अखिल भारतीय हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख कार्यवाह अधिवक्ता दत्तात्रय सणस यांनी केले.
राजवाडा येथील उमेश गांधी यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजली सभेत अधिवक्ता सणस बोलत होते. तत्पूर्वी स्व. अधिवक्ता गोविंदजी गांधी यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थितांनी फुले वाहून श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी स्व. अधिवक्ता गोविंदजी गांधी यांच्या विविध आठवणींना उजाळा देत त्यांनी केलेले आध्यात्मिक कार्य, हिंदुत्वाचे कार्य, सामाजिक कार्य, राजकीय कार्य, त्यांचे जीवनकार्य याविषयी मनोगत व्यक्त केले.