श्रीरामकथा ज्ञानयज्ञातील श्रीराम याग सोहळ्याची भक्तीपूर्ण वातावरणात वेदमंत्रघोषाने पूर्णाहुती !
नगर – येथील बडीसाजन मंगल कार्यालयात चालू असलेल्या श्रीरामकथा ज्ञानयज्ञ सोहळ्यात विश्वकल्याणासाठी शास्त्रोक्त श्रीराम याग संपन्न झाला. वेदमंत्रघोषात या यागाची विधीवत पूर्णाहुती प.पू. माताजी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी उपस्थितांनी केलेल्या जयजयकाराने परिसर दणाणून गेला.
सकाळच्या मंगलमय वातावरणात श्रीगणपतीचे पूजन करून विश्वकल्याणाचा संकल्प करत श्रीराम यागाचा शुभारंभ करण्यात आला. सुरेख चौकोनी आकारातील सशोभित यज्ञकुंडासभोवती मुख्य यजमान श्रीनिवास झंवर, गणेश झंवर आणि सौ. सोनाली झंवर यांचेसह झंवर परिवारातील दांपत्य विराजमान झाले होते. ब्रह्मादी मंडल देवतांची स्थापना करण्यात आली. पंचोपचार पूजाविधी संपन्न होताच अरणीमंथन आधारे अग्नीची निर्मिती करून विधीयुक्त स्थापना करताना चालू असलेल्या मंत्रोच्चाराने वातावरण मंत्रमुग्ध झाले. अग्नी स्थापनेचा विधी पहाण्यातील उत्सुकता दिसून येत होती.
मुख्य देवता प्रभू श्रीरामचंद्रांच्या श्रीराम सहस्त्र नामावलीचे आणि श्रीविष्णू सहस्त्र नामावलीचे पठण करत हवन करण्यात आले. मातृकेचे हवन, नवग्रह हवन, रूद्र मंडल देवता हवन करण्यात आले. हवनासाठी काळे तीळ, पांढरे तीळ, सर्व औषधी, भारतीय गाईचे शुद्ध तूप, समिधा, सातू, नवग्रह समिधा यांचा वापर करण्यात आला. श्रीराम यागाचे पौरोहित्य वे.शा.सं. श्रीपाद धर्माधिकारी, वे.शा.सं. अभय कुलकर्णी, वे.शा.सं. उदय सभारंजक आणि वे.शा.सं. विकास कुलकर्णी यांनी केले.