सहसाधकाच्‍या माध्‍यमातून योग्‍य दृष्‍टीकोन समजल्‍यावर तो लगेच कृतीत आणणारा लांजा (जिल्‍हा रत्नागिरी) येथील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा कु. ऋग्‍वेद जोशी (वय १५ वर्षे) ! 

कु. ऋग्‍वेद नीलेश जोशी हा उन्‍हाळ्‍याच्‍या सुटीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात आला होता. त्‍या वेळी त्‍याला शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

कु. ऋग्‍वेद नीलेश जोशी
कु. पार्थ सुनील घनवट

१. सेवेसंदर्भात तीव्र अपेक्षा असल्‍याने स्‍वच्‍छता सेवा करतांना पुष्‍कळ संघर्ष होऊन ‘सेवा करू नये’, असे वाटणे

‘मला उन्‍हाळ्‍याची सुटी असल्‍याने मी रामनाथी आश्रमात गेलो होतो. तेथे माझे दायित्‍व असणार्‍या साधकाने मला एक स्‍वच्‍छतेची सेवा सांगितली होती. ही सेवा मला स्‍वीकारता येत नव्‍हती. ‘मला संगणक किंवा कला यांच्‍याशी संबंधित सेवा मिळायला हवी’, अशी माझी तीव्र अपेक्षा होती. त्‍यामुळे स्‍वच्‍छता सेवा करतांना माझा पुष्‍कळ संघर्ष व्‍हायचा आणि ‘सेवा करू नये’, असे मला वाटायचे.

२. नकारात्‍मक स्‍थितीवर मात करण्‍यासाठी सहसाधकाने योग्‍य दृष्‍टीकोन देणे

‘मला स्‍वच्‍छतेची सेवा करू नये’, असे वाटते. ही माझ्‍या मनाची स्‍थिती एक दिवस मी सहसाधक कु. पार्थ सुनील घनवट (आध्‍यात्मिक पातळी ५७ टक्‍के, वय १४ वर्षे) याला सांगितली. त्‍याने मला ‘आपल्‍या मनाप्रमाणे होणे ही गुरुकृपा, तर आपल्‍या मनाविरुद्ध होणे ही गुरूंची इच्‍छा असते’, असेे मला सांगितले आणि ते माझ्‍या मनावर कोरले गेले.

३. कृतीला भावाची जोड दिल्‍यामुळे सेवा पुष्‍कळ आनंदाने केली जाणे

जी कोणती सेवा मला मिळेल, ती ‘गुरूंची इच्‍छा आहे’, या भावाने स्‍वीकारली जाऊ लागली आणि त्‍यामुळे माझ्‍याकडून ती सेवा पुष्‍कळ आनंदाने केली जायची. माझ्‍या जीवनात जी कोणती परिस्‍थिती येईल, तीसुद्धा ‘गुरूंची इच्‍छा आहे’, या भावाने स्‍वीकारता आली.

४. मनात येणार्‍या इच्‍छेचा विचार सोडल्‍यावर ती इच्‍छा देवाने लगेच पूर्ण करणे

सेवा करतांना बर्‍याच वेळा मला अपेक्षा असायची की, ‘मला संतांच्‍या खोलीची स्‍वच्‍छता करायला मिळायला पाहिजे.’ ती अपेक्षा पूर्ण न झाल्‍याने मला निराशा येऊन वाईट वाटायचे. हे मी पार्थला सांगितल्‍यावर तो म्‍हणाला, ‘‘इच्‍छेचा विचार सोडून दिल्‍यावर देव ती इच्‍छा लगेच पूर्ण करतो.’’ हे वाक्‍यही माझ्‍या मनावर कोरले गेले आणि सेवा करतांना कोणतीही अपेक्षा न ठेवता केल्‍यामुळे पूर्वी माझ्‍या मनात जी सेवा करण्‍याची इच्‍छा असायची, ती सेवा मला करायला सांगायचे आणि माझी इच्‍छा पूर्ण व्‍हायची.

गुरुदेवांनीच (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनीच) सहसाधकाच्‍या माध्‍यमातून मला योग्‍य दृष्‍टीकोन देऊन त्‍यानुसार प्रयत्न करवून घेतले. त्‍याबद्दल त्‍यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– कु. ऋग्‍वेद नीलेश जोशी, लांजा (२५.५.२०२२)