कोणत्याही क्षेत्रात अव्वल होण्याचा प्रयत्न करा ! -‘पर्यावरण दूत’ धीरज वाटेकर
आय.एम्.एस्.सी.सी.आर्. संस्थेचा २३ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
चिपळूण – एकच उद्योग आयुष्यभर चालेल, असा सध्याचा काळ राहिलेला नाही. तुम्हाला बहुआयामी होणे, ही या काळाची आवश्यकता आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात अव्वल होण्याचा प्रयत्न करा, असा कानमंत्र ‘पर्यावरण दूत’ पुरस्कार प्राप्त श्री. धीरज वाटेकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.
शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे संचलित आय.एम्.एस्.सी.सी.आर्. संस्थेचा २ ऑगस्ट २०२३ या दिवशी २३ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त वर्षा उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उपस्थित असलेले श्री. धीरज वाटेकर यांनी त्यांच्या ओघवत्या शैलीत मार्गदर्शन केले. या वेळी मुख्य समन्वयक सौ. अर्चना बक्षी यांनी श्री. वाटेकर यांचा परिचय करून दिला.
मार्गदर्शन करतांना श्री. धीरज वाटेवर पुढे म्हणाले,
१. आपले आयुष्य हाच मुळी एक व्यवसाय आहे. यात तुम्ही गुंतवणूक केल्याशिवाय तुम्हाला मोबदला मिळणार नाही. तुम्ही यशस्वी झाल्यानंतरच त्या समाजाची मालमत्ता ठरता आणि समाजाप्रती तुमचे दायित्व रहाते.
२. तुम्ही कोणतेही क्षेत्र निवडा; पण त्यात अव्वल होण्याचा प्रयत्न करा, तरच तुम्ही समाजाची मालमत्ता बनू शकाल आणि त्यासाठी अपरिमित कष्ट मात्र घ्यायला हवेत.
या वेळी निसर्ग चित्र आणि औषधी वनस्पती अन् त्यांची माहिती देणार्या प्रदर्शनाचे उद्घाटन श्री. धीरज वाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शमा आगवेकर यांनी केले. नमिता मोहिते यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांचे सहकार्य लाभले.