जिल्हाधिकारी कार्यालयातील पोलीस चौकीचे लोकार्पण करण्याची मागणी
सातारा, ३ ऑगस्ट (वार्ता.) – जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस चौकी असावी, यासाठी वर्ष २००५ पासून अनेक वेळा पाठपुरावा घेण्यात आला. त्यानंतर पोलीस चौकीचे काम पूर्णत्वास गेले; परंतु अद्याप त्याचे लोकार्पण झालेले नाही. आता लोकार्पण व्हावे, यासाठी सामाजिक कार्यकर्ते पाठपुरावा घेत आहेत; मात्र लोकार्पण लवकरच होईल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील पोलीस चौकीचे लोकार्पण लवकरात लवकर व्हावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात का येत नाही ? – संपादक)
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारावर अनेक संघटनांकडून धरणे आंदोलन, निषेध आंदोलन, उपोषण, मोर्चे होत असतात. याच्या बंदोबस्तासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना ऊन, वारा, पाऊस यांच्यापासून संरक्षणासाठी पोलीस चौकीची आवश्यकता आहे. अनेक वेळा मागणी केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस चौकीचे निर्माण करण्यात आले; मात्र काम पूर्ण होऊन बरेच दिवस झाले, तरी अद्याप पोलीस चौकीचे लोकार्पण झालेले नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बंदोबस्तासाठी असणार्या पोलीस कर्मचार्यांना याचा लाभ घेता आलेला नाही. याविषयी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला असता, त्यांनी ‘हा प्रश्न जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून सोडवून घ्यावा’, असे कळवले आहे. ‘जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी १५ दिवसांत हा प्रश्न सोडवला नाही, तर १४ ऑगस्टपासून अनिश्चित काळासाठी उपोषणाला बसू’, अशी चेतावणी सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली आहे.