(म्हणे) शमसीर क्षमा मागणार नाहीत ! – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा उद्दामपणा !

केरळ विधानसभेचे अध्यक्ष शमसीर यांनी हिंदु देवतांविषयीचे वक्तव्य मागे घेऊन क्षमा मागावी ! – हिंदूंची मागणी

केरळ विधानसभेचे अध्यक्ष शमसीर

थिरूवनंतपूरम् (केरळ) – हिंदु देवतांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे केरळ विधानसभेचे अध्यक्ष ए.एन्. शमसीर यांच्या विरोधात प्रचंड आक्रोश चालू आहे. शमसीर यांनी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य मागे घ्यावे आणि क्षमा मागावी, अशी मागणी हिंदूंनी केली आहे. या पाश्‍वभूमीवर शमसीर यांनी ‘कुठल्याही धर्माच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता’, असे स्पष्टीकरण दिले. दुसरीकडे केरळमधील सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने ‘विधानसभेचे अध्यक्ष ए.एन्. शमसीर हिंदु देवतांविषयीच्या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याविषयी क्षमा मागणार नाहीत’, असे उद्दामपणे सांगितले. माकपचे राज्य सचिव एम्.व्ही. गोविंदन् यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले की, शमसीर यांच्या विधानाविषयी क्षमा मागण्याची आवश्यकता नाही. त्यांनी जे सांगितले ते पूर्णपणे बरोबर आहे.

काय म्हणाले होते शमसीर ?

केरळ विधानसभेचे अध्यक्ष शमसीर यांनी एका कार्यक्रमात ‘गजमुख असलेला भगवान श्री गणेश ही केवळ एक दंतकथा आहे. या समजुतीला कोणताही शास्त्रीय आधार नाही’, असे वक्तव्य केले होते. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी भाजप आणि विहिंप यांच्याकडून त्यांच्या विरोधात निदर्शने केली जात आहेत.

संपादकीय भूमिका

  • धर्मनिरपेक्ष राज्यघटनेने दिलेल्या पदावर असलेल्या एक मुसलमान व्यक्तीने सर्रासपणे हिंदुद्वेषी विधाने करूनही तिच्याविषयी सरकार, पोलीस, प्रशासन, लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्षतावादी आदी कुणीही काहीही बोलत नाही, हे लक्षात घ्या !