राज्यातील मंदिरांचा आढावा घेण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ यांच्या नावाने योजना चालू करू ! – गिरीश महाजन, ग्रामविकास मंत्री
विधान परिषद प्रश्नोत्तरे…
देवस्थानांच्या समस्या सोडवण्याचे उपसभापतींचे आमदारांना आवाहन !
मुंबई, ३ ऑगस्ट (वार्ता.) – राज्यातील सर्व मंदिरांच्या सर्वांगीण विकासासाठी वाढीव निधी देण्याचा सरकार गांभीर्याने विचार करत आहे. महाराष्ट्रातील सर्वच मंदिरांच्या सद्यस्थितीचा म्हणजे रस्ते, सुशोभिकरण, दुरुस्ती, जीर्णोद्धार इत्यादी गोष्टींचा आढावा घेऊ. त्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ यांच्या नावाने योजना चालू करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल, असे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य गोपीनाथ पडळकर यांनी ३ ऑगस्ट या दिवशी निमगाव (तालुका खेड, जिल्हा पुणे) येथील श्री क्षेत्र खंडोबा देवस्थानाकडे जाणारा रस्ता आणि नदीजवळ असलेली काँक्रीटची भिंत उभारण्याविषयी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्या वेळी ते बोलत होते.
गिरीश महाजन म्हणाले की, श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान विकासकामासाठी ६५ लाख रुपयांची तरतूद जिल्हा नियोजन समिती (डी.पी.डी.सी.) माध्यमातून करण्यात येईल. मंदिरांची वर्गवारी ही तेथे येणार्या भाविकांच्या संख्येवरून ठरते. ‘अ’ वर्गासाठी २५ कोटी रुपयांपर्यंत, ‘ब’ला ५ कोटी रुपयांपर्यंत, तर ‘क’ वर्गातील ‘डी.पी.डी.सी.’च्या माध्यमातून निधी देण्यात येतो. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी स्थापन केलेल्या ‘बारव’ (पाणी विहीर) यांना ‘संरक्षित क्षेत्र’ म्हणून ठरवण्याचा प्रयत्न करू, तसेच जळगाव येथील मुक्ताईनगर येथील मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी निधी लवकरच देऊन मंदिराचे बांधकाम पूर्ण करू, तसेच पाली देवस्थानाला निधी देणे आणि ‘विकासकामांसंदर्भात लवकरच बैठक घेऊ’, असे त्यांनी आश्वासन दिले.
उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांचे आमदारांना आवाहन !
राज्यातील जे जे आमदार धार्मिक स्थळांना भेटी देतात, तेव्हा तेथील वारकरी आणि विश्वस्त हे देवस्थानांना येणार्या अडचणी अन् तक्रारी मांडतात. त्यामुळे आमदारांनी त्यांचे निवेदन संबंधित मंत्री आणि विभाग यांना दिले, तर ती कामे पूर्ण होण्यास साहाय्य होईल. प्रत्येक वेळी भेटी दिल्यानंतर त्याच-त्याच समस्या ते सांगतात; मात्र त्या समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करत नाहीत, हे योग्य नाही. त्यांच्या समस्या ऐकून खंत वाटते, असे उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी सभागृहात सांगितले.