सोलापूर जिल्ह्यातील ‘जल जीवन मिशन’अंतर्गतचे उद्दिष्ट डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार ! – गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री
मुंबई, ३ ऑगस्ट (वार्ता.) – सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत जुलै २०२३ अखेर १६ सहस्र ९१ नळजोडण्या झालेल्या आहेत. डिसेंबर २०२३ पर्यंत ८५५ पाणीपुरवठा योजनांतील नळजोडण्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या पाणी योजनांना जागा उपलब्ध असेल, त्या ठिकाणी ‘सौर ऊर्जा’ देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. सोलापूर जिल्ह्याला दिलेल्या ७५ सहस्र नळजोडण्यांच्या उद्दिष्टांविषयी सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी ३ ऑगस्ट या दिवशी हा तारांकित प्रश्न विधान परिषदेत उपस्थित केला होता.
मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, ग्रामपंचायतींकडे स्वतंत्र योजना असल्याने ३४७ ग्रामपंचायतींना नळ जोडणी योजना देता येत नाही. जत तालुक्यातील उमदी परिसरातील २९ गावांना वैयक्तिक पाणीपुरवठा योजना हव्या असतील आणि जनतेला ही योजना मान्य होईल, असे प्रयत्न करू, तसेच लासलगाव पाणीपुरवठा योजना अन् उमदी पाणीपुरवठा योजनांसंदर्भात ७ दिवसांमध्ये संबंधितांसमवेत बैठक घेण्यात येईल.