सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणार्यांवर कारवाई करणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
पणजी, २ ऑगस्ट (वार्ता.) – मद्यप्राशन करण्यात येत असलेली सार्वजनिक ठिकाणे शोधून काढून अशा ठिकाणी मद्यपान करणार्या संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी चेतावणी गृहमंत्रीपद सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. भाजपचे आमदार दिगंबर कामत यांनी राज्यात वाढत्या अपघाताला अनुसरून ‘सरकार अपघात टाळण्यासाठी कोणती उपाययोजना करणार ?’ याविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली.
या वेळी चर्चेत सहभाग घेतांना भाजपचे नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा म्हणाले, ‘‘अनेक सार्वजनिक ठिकाणी काही जण मद्यप्राशन करत असल्याचे आढळत आहे. अशांवर कारवाई केल्यास अपघातांची संख्या अल्प होण्यास साहाय्य होईल.’’ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘सार्वजनिक बांधकाम खाते, पोलिसांचा वाहतूक विभाग आणि वाहतूक खाते हे अपघात अल्प करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या तिन्ही विभागांनी अपघात अल्प करण्यासाठी लोकांकडून सूचना मागवून उपाययोजनांवर कार्यवाही आरंभली आहे.’’