समृद्धी महामार्गावर १०-१५ मिनिटांत रुग्णवाहिका पोचण्याची व्यवस्था करणार ! – दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम विभाग
मुंबई, ३ ऑगस्ट (वार्ता.) – समृद्धी महामार्गावर आतापर्यंत १०९ अपघात झाले आहेत. अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. या महामार्गावर अपघात झाल्यास १०-१५ मिनिटांत रुग्णवाहिका पोचण्याचे व्यवस्था निर्माण करण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री दादाजी भुसे यांनी ३ ऑगस्ट या दिवशी विधानसभेत दिले. काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्याविषयीची लक्षवेधी सूचना सभागृहात उपस्थित केली होती.
याविषयी अधिक माहिती देतांना दादाजी भुसे म्हणाले,‘‘नियंत्रण सुटणे, झोप येणे, मागून वाहनाने धडक देणे, तांत्रिक बिघाड आदी कारणामुळे समृद्धी महामार्गावर ५३ अपघात झाले आहेत. आतापर्यंत या महामार्गावरील सर्व अपघात मानवी चुकांमुळे झाले आहेत. अपघात रोखण्यासाठी चारचाकी वाहने, अवजड वाहने आणि अतिजड वाहने यांसाठी स्वतंत्र मार्ग आहेत. या महामार्गावरून जाणार्या सर्व बसचालकांची ‘अल्कोहोल’ (मद्यप्राशन केली आहे का ? याविषयीची चाचणी) चाचणी केली जाते. नियमांचे उल्लंघन करणार्या १ सहस्र ३०० जणांवर या महामार्गावर कारवाई करण्यात आली आहे.’’