मागील साडेतीन वर्षांत गोव्यातून बेपत्ता झालेल्या ८२९ महिला आणि मुले यांपैकी ६९५ जणांचा शोध लागला !
|
पणजी, २ ऑगस्ट (वार्ता.) – मागील साडेतीन वर्षांत गोव्यातून ८२९ महिला आणि मुले बेपत्ता झाली होती. यांतील ६९५ महिला आणि मुले यांचा शोध लागला आहे, तर १३४ महिला अन् मुले अजूनही बेपत्ता आहेत, अशी माहिती गृहमंत्रीपद सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिली. ‘रिव्होल्युशनरी गोवन्स’चे आमदार वीरेश बोरकर यांनी पोलीस दलातील ‘पिंक फोर्स’संबंधी (महिला पोलिसांच्या दलासंबंधी) विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘अजूनही बेपत्ता असलेल्या १३४ महिला आणि मुले यांमधील बहुतेक जण प्रौढ आहेत. यामुळे ही प्रकरणे संवेदनशीलपणे हाताळली जात आहेत.’’ राज्यसभेत २६ जुलै २०२३ या दिवशी दिलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात केंद्रशासनाने गोव्यातून वर्ष २०१९ ते २०२१ या २ वर्षांच्या कालावधीत १ सहस्र ४७१ महिला आणि ७९ मुले बेपत्ता झाल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री ‘पिंक फोर्स’संबंधी बोलतांना पुढे म्हणाले, ‘‘सरकार बसस्थानके, फेरीबोट सेवा आदी वर्दळीच्या ठिकाणी, तसेच समुद्रकिनारपट्टीवर विशेष ‘पिंक फोर्स’ नेमण्याचा विचार करत आहे.’’
मागील साडेतीन वर्षांत महिलांवरील अत्याचारांचे ५३३ गुन्हे नोंद
जानेवारी २०२१ ते जून २०२३ या कालावधीत महिलांवरील अत्याचाराला अनुसरून ५३३ गुन्ह्यांची नोंद झाल्याची माहिती सरकारने विधानसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तरादाखल दिली.