पंचांग म्हणजे कालमान विश्लेषक शास्त्र ! – पंचांगकर्ते मोहन दाते, सोलापूर
फोंडा (गोवा) – भारतीय पंचांग शास्त्र हे आस्तिक लोकांच्या भावनांशी सर्वार्थाने जोडलेले आहे. तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण ही पंचांगशास्त्राची ५ प्रमुख अंगे आहेत. पंचांगशास्त्राला विज्ञानाचा आधार आहे. त्यामुळे केवळ धार्मिक मार्गदर्शिका म्हणून पंचांगाकडे न बघता खगोल विज्ञानाच्या माध्यमातून काल विधान करणे आणि कालनिर्णय जाणणे, हे पंचांगशास्त्रामुळे शक्य आहे, अशी माहिती सोलापूर येथील ‘दाते पंचांगा’चे विद्यमान पंचांगकार आणि सुप्रसिद्ध धर्मशास्त्र जाणकार श्री. मोहन दाते यांनी दिली. नागेशी येथील श्री नागेश महारुद्र देवस्थानच्या मयुरेश सभागृहात २७ ते २९ जुलै या कालावधीत झालेल्या भारतीय पंचांग मार्गदर्शन कार्यशाळेच्या वेळी ते बोलत होते.
आजोबा गोपाळ दाते यांनी चालू केलेले पंचांगनिर्मितीचे कार्य वडील धुंडिराजशास्त्री दाते आणि चुलते श्रीधरपंत दाते यांच्यानंतर अद्यापपर्यंत समर्थपणे चालू असल्याचे श्री. मोहन दाते यांनी सांगितले. ‘प्राचीन काळात घटीका आणि पळ हे कालमापनाचे साधन होते. त्याचे रूपांतर तास आणि मिनिट या आधुनिक भारतीय कालशास्त्रामध्ये करण्यासह संस्कृत शब्दांचे रूपांतर मराठीत करून आम्ही पंचांग प्रक्रियेमध्ये सुलभता आणली’, असे त्यांनी या वेळी सांगितले.
श्री. दाते पुढे म्हणाले की,
१. पंचांगशास्त्र हिंदु राष्ट्राच्या व्यवहारात महत्त्वाची भूमिका बजावत असते; म्हणूनच पंचांगशास्त्रामध्ये एकमत आणि एकवाच्यता हवी. त्यासाठी मी प्रयत्नशील आहे.
२. भारतीय मासांची नावे ही पूर्ण अर्थाची असून इंग्रजी मासांच्या नावांना कोणताही शास्त्रीय आधार नाही. भारतीय मास नक्षत्रांच्या नावावरूनच निर्माण झाले आहेत. चंद्रोदय, चंद्रास्त, सूर्योदय, सूर्यास्त अथवा चंद्रकलेवरून तिथी आणि काल जाणणारे काही लोक अजूनही आहेत.
३. पंचांग हे शिकण्याचे आणि समजून घेण्याचे शास्त्र आहे. पंचांगनिर्मितीमध्ये एकूण ६० नामसंवत्सरांचा वापर झाला असून विजयी आणि पराक्रमी राजांची नावे प्रतिवर्षी एका पाठोपाठ एक येणार्या संवत्सरांना देण्यात आली आहेत.
४. सूर्य आणि चंद्र हे पंचांगाचे आधार आहेत. खगोलाचे वर्तुळ हे ३६० अंशांचे असते. सूर्य आणि चंद्र यांच्यात ० (शून्य) अंश अंतर असतांना अमावास्या असते. अमावास्येनंतर सूर्य आणि चंद्र यांच्यात १२ अंशांचे अंतर झाल्यावर १ तिथी पूर्ण होते, २४ अंश पूर्ण झाल्यावर २ तिथी पूर्ण होतात इत्यादी. असे होत होत सूर्य आणि चंद्र यांच्यात १८० अंश अंतर झाल्यावर पौर्णिमा पूर्ण होते. भारतीय कालमापनपद्धतीनुसार एका सूर्योदयापासून दुसर्या सूर्योदयापर्यंत एक वार असतो.