मुंबईमध्ये विसर्जनासाठी ३०८ कृत्रिम तलाव उभारणार !
मुंबई महापालिका मुख्यालयातील बैठकीतील निर्णय !
मुंबई – मुंबई महानगरपालिकेने श्री गणेशमूर्ती विसर्जन सोहळ्यात कमतरता भासू नये, नैसर्गिक स्रोतांचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने यंदा श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यंदा मुंबईमध्ये विसर्जनासाठी ३०८ कृत्रिम तलाव उभारण्यात येणार आहेत. ६९ नैसर्गिक विसर्जनस्थळी गणेशमूर्ती विसर्जन व्यवस्था करण्यात येणार आहे. मुंबई महापालिका मुख्यालयात संयुक्त बैठक घेऊन गणेश मूर्तीकार, गणेशोत्सव मंडळे आणि गणेशभक्त यांच्या विविध अडचणी अन् समस्या यांविषयी चर्चा करण्यात आली.
या बैठकीला मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्यासह महापालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि गणेशोत्सव समन्वय महासंघाचे अध्यक्ष जयेंद्र साळगावकर, सरचिटणीस सुरेश सरनौबत अन् पदाधिकारी, मूर्तीकार संघाचे पदाधिकारी, भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे आदी उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेश मूर्तीसाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर करण्यावर बंदी घातलेली नाही. मात्र, मूर्ती विसर्जनामुळे नैसर्गिक जलस्त्रोतांचे प्रदूषण होऊ नये, याची खबरदारी घेतली पाहिजे. त्यासाठी मुंबईतील गिरगाव चौपाटी सारख्या ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्याचा सरकारचा… pic.twitter.com/jnpuX3uLuQ
— Deepak Kesarkar (@dvkesarkar) July 26, 2023
१. गेल्या वर्षीपर्यंत केवळ १६२ ते १७३ कृत्रिम तलाव सिद्ध केलेली होते. यंदा तलावांची संख्या दुप्पट करण्यात आली आहे. सरसकट पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदी घालून कारखान्यांवर धाडसत्र राबवणे अशी कारवाई महापालिका करणार होती; पण त्याला या बैठकीत विरोध करण्यात आला होता.
२. ‘प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्यात येणार आहे. पीओपीच्या मूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर त्यांचे योग्य पद्धतीने विघटन करावे’, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
३. बाजारात मोठ्या प्रमाणात चिनी गणेशमूर्ती येत असून त्यावर सरसकट बंदी घालावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. ही मागणी पूर्ण करण्याची सिद्धता महापालिकेने दर्शवली आहे. (गणेशभक्तांनो, बाजारातील चिनी गणेशमूर्तींना संघटित होऊन विरोध करा ! – संपादक)
मुंबई महानगरपालिकेचा स्तुत्य प्रयत्न !मूर्तीकारांना २०५ मेट्रिक टन शाडू माती उपलब्ध ! मुंबई महानगरपालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पुढाकार घेतला आहे. पर्यावरणपूरक मूर्ती घडवण्यासाठी मूर्तीकारांना देण्यासाठी २०५ मेट्रिक टन शाडू माती उपलब्ध करण्यात आली आहे. मागणीनुसार अधिक मातीही उपलब्ध करून दिली जाईल. |
संपादकीय भूमिका :‘कृत्रिम तलाव’ ही धर्मविरोधी संकल्पना असल्याने तिचा अवलंब करण्यापेक्षा वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करावे आणि धर्माचरण करावे ! |