नागरिकांनी आभा आरोग्य कार्डसाठी नोंदणी करावी ! – सार्वजनिक आरोग्य विभाग
रत्नागिरी – आयुष्मान भारत डिजिटल मिशनचा (आभा) एक भाग म्हणून भारत सरकारने ‘डिजिटल हेल्थ कार्ड’ हा उपक्रम चालू केला आहे. राज्यातील सर्व नागरिकांसाठी हे ‘हेल्थ कार्ड’ आवश्यक आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी या आभा कार्डसाठी नोंदणी करावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.
रुग्णांची सर्व माहिती एकाच ठिकाणी आणि तीही डिजिटल स्वरूपात मिळावी, म्हणून आभा कार्ड चालू करण्यात आले आहे. सामान्यतः रुग्ण आजारी पडल्यानंतर रुग्णालयामध्ये कागदी फाईल दिली जाते. प्रत्येक वेळी तपासणीसाठी रुग्णांना फाईल समवेत बाळगावी लागते. त्याचप्रमाणे डॉक्टरांनाही मागील सर्व ‘रिपोर्टस’ तपासून पहावे लागतात. या सर्व गोष्टींचा विचार करता शासनाकडून आता नागरिकांना आभा आरोग्य कार्ड दिले जाणार आहे. आभा आरोग्य कार्ड म्हणजेच आयुष्मान भारत आरोग्य खाते होय.
आभा कार्ड नावाने डिजिटल स्वरूपातील ‘हेल्थ आयडी’ मिळणार असून, या कार्डवर तुमचा वैद्यकीय इतिहास, चाचण्या, केलेले उपचार आदी माहिती साठवली जाणार आहे. ही सर्व माहिती डिजिटल स्वरूपात आभा कार्डवर साठवली जाणार असल्यामुळे नागरिकांना तसेच डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी यांना रुग्णांची पार्श्वभूमी म्हणजेच मागील आजार, निदान, उपचार आदींची माहिती जलद आणि सोयीस्करपणे समजण्यास साहाय्य होणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होणार आहे. आभा आरोग्य कार्डच्या साहाय्याने देशभरातील सर्व रुग्णालयांमध्ये उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी ‘युनिक हेल्थ कार्ड’ बनवले जाणार आहे.