पर्यटकांकडून ‘इन्स्टाग्राम’च्या माध्यमातून गोव्याची अपकीर्ती : कारवाई करण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश

गोवा विधानसभा अधिवेशन

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी, १ ऑगस्ट (वार्ता.) – ‘इन्स्टाग्राम’चा वापर करणारे पर्यटक गोव्यात येऊन राज्याची अपकीर्ती करत आहेत. या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश सायबर गुन्हे विभागाला देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिली. भाजपचे वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी विधानसभेत शून्य प्रहराच्या वेळी केलेल्या मागणीला अनुसरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हा आदेश दिला.

प्रारंभी आमदार दाजी साळकर म्हणाले, ‘‘गोव्यात येणारे पर्यटक ‘इन्स्टाग्राम’च्या माध्यमातून गोव्याचे नाव अपकीर्त करत आहेत. पणजी येथील इमॅक्युलेट चर्च या ठिकाणी गोव्याचे नाव अपकीर्त करणारे ‘रिल’ (चलचित्र) काही पर्यटकांनी ‘इन्स्टाग्राम’वर प्रसारित केले. अशा पर्यटकांचे ‘इन्स्टाग्राम’वरील खाते ‘ब्लॉक’ (बंद) करावे.’’

सरकारने कारवाईचे आदेश दिल्यानंतर ‘इन्स्टाग्राम’ खातेधारक युवतीने गोमंतकियांची क्षमा मागितली

‘इस्टाग्राम’च्या माध्यमातून गोव्याची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी सरकारने १ ऑगस्ट या दिवशी कारवाईचा आदेश दिल्यानंतर सायंकाळी संबंधित युवती मोनालीशा घोष हिने एक चलचित्र प्रसारित करून या प्रकरणी गोमंतकियांची क्षमा मागितली आहे.

 (सौजन्य : Goa Plus News Channel)

‘मी ही कृती हेतूपुरस्सर केली नाही’, असा दावा या युवतीने चलचित्रात केला आहे.