मेट्रो ही आधुनिक भारतातील शहरांची जीवनरेखा ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या मार्गिकांसह विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमीपूजन !
पुणे – शहरी मध्यमवर्गीयांच्या जीवनशैलीविषयी सरकार गंभीर असून सर्वसामान्यांचे जीवन सुकर करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिक बनवावे लागेल. त्यादृष्टीने पुणे शहरात मेट्रो चालू करण्यात आली असून मेट्रो ही आधुनिक भारतातील शहरांची जीवनरेखा बनत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान मोदी यांनी पुणे मेट्रोच्या टप्पा २ च्या पूर्ण झालेल्या २ मार्गिकांचे हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण केले. शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालय येथे आयोजित या कार्यक्रमात मेट्रो लोकार्पणासह पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत कचर्यापासून ऊर्जा निर्माण करणार्या (वेस्ट टू एनर्जी) संयंत्राचे उद्घाटन, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेद्वारे ‘प्रधानमंत्री आवास योजनें’तर्गत बांधण्यात आलेल्या घरांचे लाभार्थ्यांना हस्तांतरण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे, आमदार चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते.
Congratulations Pune –
A Defining Moment for Pune…. The Dawn of a New Era….आज दि. १ ऑगस्ट २०२३ रोजी मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते पुणे मेट्रोच्या दोन मार्गिकेचा लोकार्पण सोहळा पार पडला.
(फुगेवाडी मेट्रो स्थानक ते सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानक आणि गरवारे… pic.twitter.com/2B4ZPRA1bw
— Pune Metro Rail (@metrorailpune) August 1, 2023
प्रधानमंत्री मोदी यांनी मेट्रोच्या दोन्ही मार्गांना हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण केले आणि प्रातिनिधिक स्वरूपात ३ महिलांना ‘प्रधानमंत्री आवास योजने’तील घरांच्या चाव्या वितरीत केल्या. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, ‘‘या ५ वर्षांत पुण्यात अनुमाने २४ कि.मी. मेट्रोचे नेटवर्क चालू झाले आहे. पुण्यासारख्या शहरात प्रदूषण अल्प करण्यासाठी मेट्रो रेल्वे आवश्यक असून हे जाळे वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. वर्ष २०१४ पर्यंत देशात २५० कि.मी.पेक्षा अल्प मेट्रो नेटवर्क होते. आता देशात ८०० कि.मी.पेक्षा अधिक मेट्रोचे जाळे सिद्ध झाले असून आणखी १ सहस्र कि.मी. काम चालू आहे. वर्ष २०१४ मध्ये फक्त ५ शहरांत असलेली मेट्रो आज देशातील २० शहरांत संचालित आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि नागपूर येथे मेट्रो कार्यरत आहेत.’’
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे शहराच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी दोन मेट्रो मार्गाचं लोकार्पण केलं.
–#NarendraModi #pmmodi #BJP4IND #LetsUppMarathi #MaharashtraNews pic.twitter.com/NUKTI3yCFi— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) August 1, 2023
स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाने देशाच्या औद्योगिक विकासाला गती दिली आहे; म्हणून येथे औद्योगिक विकासाला अधिक गती देण्यासाठी पायाभूत सुविधांवर अधिक भर देण्यात येत आहे. रेल्वेच्या विकासात वर्ष २०१४ च्या तुलनेत १२ पट अधिक खर्च केला जात आहे. महाराष्ट्राच्या विविध शहरांना आसपासच्या इकॉनॉमिक हबशी जोडले जात आहे. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे, देहली-मुंबई ‘इकॉनॉमिक कॉरिडॉर’मुळे औद्योगिक विकास होणार आहे. डिजिटल क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासात पुण्याचा मोठा वाटा आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात ‘प्रधानमंत्री आवास योजने’अंतर्गत बांधलेल्या घरांमुळे नागरिकांसाठी येणारे सण विशेष आनंदाचे ठरतील, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
देशाची ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी महाराष्ट्र योगदान देईल ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘पुणे शहर, जिल्हा ही एक ऐतिहासिक नगरी आहे. येथे मेट्रो प्रकल्पाचा शुभारंभ झाला आहे. पुणे मेट्रोमुळे मुंबई शहरासारखाच लाखो पुणेकरांनाही लाभ मिळणार आहे. रिंग रोडसह पुणे शहरात विविध विकास प्रकल्प चालू आहेत त्याला चालना देण्याचे काम सरकार करेल. शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता-भगिनी, विद्यार्थी, तरुण या सर्वांसह सर्वसमावेशक विकासाचा रथ पुढे नेण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. मोदी यांच्या प्रयत्नांमुळे जगभरात भारताचे नाव आदराने घेतले जाते. देशाचे ५ ट्रिलीयन डॉलरचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राची १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचे आपले दायित्व असून त्यात महाराष्ट्र योगदान देईल.’’
पुणे मेट्रोमुळे वाहतुकीची समस्या दूर होईल ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘आज मेट्रोच्या दोन मार्गिका जोडल्या जात असल्यामुळे एका भागातून दुसर्या भागात जाण्याकरिता विशेष साहाय्य या ‘क्रॉसिंग’मुळे होणार आहे. मेट्रोचा वाढीव टप्पा पूर्ण होईल तेव्हा खर्या अर्थाने पुणे आणि पिंपरी शहरातील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. देशातील सर्वोत्तम इलेक्ट्रिक बसेसचा ताफा पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरामध्ये पीएमपीएमएलकडे आहे. श्री. मोदी यांची संकल्पना असलेली कुठलेही प्रदूषण न करणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुण्यामध्ये होत आहे. येत्या काळात पुण्याला नवीन रिंगरोड आणि नवीन विमानतळ देणार आहोत. खर्या अर्थाने पुणे ही जशी विद्येची, उद्योगाची नगरी आहे तशी ती स्वप्नपूर्तीची नगरी होईल हा विश्वास आहे.’’
शहराच्या विकासात पुणेकरांची साथ ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘‘पुणे शहराच्या विकासासह महाराष्ट्राच्या विकासाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच साथ दिली आहे. मेट्रोच्या दुसर्या टप्प्याचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत असल्याचा आनंद आहे. मेट्रोच्या कामामध्ये येणार्या अडचणी सोडवण्यासाठी पुणेकरांनी एकजुटीने काम केले. ३५० वर्षांपूर्वी राजमाता जिजाऊंनी बाल शिवबांच्या हस्ते सोन्याचा नांगर फिरवून पुण्याचा विकास करण्याचे काम केले. या भूमीत अनेक कला, क्रीडा तसेच गुणवंत, बुद्धीवंत यांनी पुण्याच्या विकासामध्ये योगदान दिले. शेतकरी, कष्टकरी यांनी पुण्याच्या वैभवात भर घातली. उद्योजकांनी आर्थिक सुबत्ता आणण्याचा प्रयत्न केला. देशातील प्रत्येक गोरगरीब, कष्टकर्याला स्वस्तात घर देण्याचे पंतप्रधान यांचे स्वप्न आहे.’’