यापुढे ‘जशास-तसे’ प्रत्युत्तर देऊ ! – सागर आमले, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

कराड येथे पू. भिडे गुरुजी यांच्या समर्थनार्थ भव्य आंदोलन !

पू. भिडेगुरुजी यांच्या समर्थनार्थ शिवतीर्थावर उपस्थित असणारे हिंदुत्वनिष्ठ

कराड, १ ऑगस्ट (वार्ता.) – काही राजकीय संघटनांचे नेतेमंडळी आणि कार्यकर्ते भिडे गुरुजी यांच्यावर अत्यंत हिन दर्जाची चिखलफेक करीत आहेत. काही ठिकाणी गुरुजींच्या प्रतिमेस जोडे मारण्यात येऊन त्यांचे पोस्टर फाडणे असे गैरकृत्य केल्याचे समाज माध्यमातून निदर्शनास येत आहे. प्रशासनाने वेळीच अशा गैरकृत्य करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा यापुढे ‘जशास-तसे’ प्रत्युत्तर देण्यात येईल, अशी चेतावणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कराड-पाटण तालुक्याचे कार्यवाह श्री. सागर आमले यांनी दिली.

निवेदनाची प्रत (वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

श्रद्धा वालकर वा पालघर येथे साधूंचे झालेले हत्याकांड असो अशा विविध आघातांच्या विरोधात हे राजकीय नेतेमंडळी रस्त्यावर का उतरले नाहीत. ज्या विधानसभेत अबू आझमी यांनी ‘वन्दे मातरम्’ म्हणणार नाही, असे सांगितल्यावर त्यास विरोध का केला नाही ? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. काही लोकांनी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेला आर्थिक साहाय्य कोण करते ? याच्या चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी हे लक्षात ठेवावे की, आम्ही निष्काम भावनेने, स्वखर्चाने हे कार्य करीत आहोत. निष्ठा ही बाजारात विकत घेता येत नाही, असे परखड मत श्री. आमले यांनी व्यक्त केले. या वेळी येथील शिवतीर्थावर पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या समर्थनार्थ कराड तालुक्यातील विविध संघटनांचे हिंदुत्वनिष्ठ आणि धारकरी सहस्रोंच्या संख्येने उपस्थित होते. यानंतर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने कराड येथील प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे आणि तहसीलदार विजय पवार यांना निवेदन देण्यात आले. मागील काही दिवसांतील घडामोडी पहाता आंदोलन स्थळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.