देहली येथील सनातनचे सेवाकेंद्र नवीन वास्तूत स्थलांतरित करतांना सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या अनुभूती !
‘गुरुदेवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), आपल्याच कृपेमुळे देहलीमध्ये सनातनच्या सेवाकेंद्रासाठी नवीन वास्तू मिळाली आहे. २९.११.२०२२ या दिवशी देहली येथील सनातनचे सेवाकेंद्र नवीन वास्तूमध्ये स्थलांतरित करतांना साधकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. श्रीकृष्णाचे चित्र, तसेच प.पू. भक्तराज महाराज आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची छायाचित्रे अन् पादुका लहान पालखीत घेऊन सेवाकेंद्रात प्रवेश करणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने आम्हाला देहली येथील सनातनच्या सेवाकेंद्रासाठी नवीन वास्तू मिळाली. ‘२९.११.२०२२ या दिवशी दुपारी १२ ते १२.३० या मुहूर्ताच्या वेळेत नवीन वास्तूत प्रवेश करावा’, असे पुरोहित साधकांनी आम्हाला सांगितले होते. त्यानुसार त्या वेळेत आम्ही ध्यानमंदिरातील श्रीकृष्णाचे चित्र, तसेच प.पू. भक्तराज महाराज आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची छायाचित्रे अन् पादुका पालखीत घेऊन अन् श्री गणेशमूर्ती समवेत घेऊन नवीन सेवाकेंद्राच्या वास्तूत प्रवेश केला.
२. पूजा चालू असतांना गुरुदेवांची छायाचित्रे आणि सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्यावर सूर्यनारायणाचे प्रकाशकिरण येणे
नवीन सेवाकेंद्राच्या वास्तूत प्रवेश केल्यानंतर साधकांनी श्रीकृष्णाचे चित्र, श्री गणेशाची मूर्ती, गुरुदेवांची छायाचित्रे आणि पादुका यांची ध्यानमंदिरात स्थापना केली. सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी त्यांची पूजा केली. पूजेची वेळ दुपारी १२.३० पर्यंत होती. सद़्गुरु पिंगळेकाका पूजा करतांना आणि पूजा झाल्यानंतर काही वेळ गुरुदेवांच्या छायाचित्रांवर अन् जेथे सद़्गुरु पिंगळेकाका उभे होते, तिथे सूर्यनारायणाचे किरण येत होते.
३. पूजेच्या वेळी ‘सूर्यनारायणाच्या किरणांच्या रूपात साक्षात् गुरुदेवच आले आहेत’, अशी अनुभूती येणे
माध्यान्हीच्या वेळी सूर्य डोक्यावर असतो. त्यामुळे तिरपे प्रकाशकिरण येणे अशक्य असते. नवीन सेवाकेंद्राच्या वास्तूत ध्यानमंदिर तळमाळ्यावर असल्यामुळे जवळजवळ २५ फूट तिरपे सूर्यकिरण आत येणे अशक्यच आहे. ध्यानमंदिर केवळ ५ – ६ फूट रुंदीचे असल्यामुळे एवढा तिरपा सूर्यप्रकाश आत येणे अशक्यच आहे. त्यामुळे ‘पूजेच्या वेळी सूर्यनारायणाच्या किरणांच्या रूपात साक्षात् गुरुदेवच ध्यानमंदिरात आले’, अशी अनुभूती आम्हा सर्वांनाच आली.
४. केवळ सेवाकेंद्र स्थलांतरित करण्याच्या दिवशीच खिडकीतून प्रकाश येणे
पूजेच्या वेळी भगवान सूर्यनारायणाचे किरण खिडकीतून आले. आश्चर्याची गोष्ट, म्हणजे सूर्यकिरण केवळ त्याच दिवशी तिथून आले. त्यानंतर आजपर्यंत ध्यानमंदिरात किंवा त्याच्या वरच्या माळ्यावर असलेल्या स्वयंपाकघरात प्रकाशकिरण कधीच आले नाहीत.
५. ‘नवीन सेवाकेंद्राच्या भिंतीवरील लाल रंगाच्या दिव्य प्रकाशातून परात्पर गुरुदेव साधकांना सेवा करण्यासाठी शक्ती देत आहेत’, असे जाणवणे
दुसर्या दिवशी सर्व साधक जुन्या सेवाकेंद्रातून नवीन सेवाकेंद्रात साहित्य आणण्याची सेवा करत होते. तेव्हा नवीन सेवाकेंद्राच्या भिंतीवर लाल रंगाचा दिव्य प्रकाश दिसला. तो पाहून माझ्या मनात विचार आला, ‘गुरुदेव, या लाल रंगाच्या दिव्य प्रकाशातून आपणच आम्हा सर्व साधकांना सेवा करण्यासाठी शक्ती देत आहात.’
– सुश्री (कु.) पूनम चौधरी आणि देहली सेवाकेंद्रातील सर्व साधक (२०.१.२०२३)
८.१२.२०२२ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘आयुष्य होम’ असतांना देहली सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या अनुभूती
१. नवीन सेवाकेंद्राच्या बाजूला असलेल्या उंच इमारतीतील थोड्याशा जागेतून सूर्यकिरण भोजनकक्षात येणे आणि त्या प्रकाशाने भोजनकक्ष उजळून टाकणे
‘देहली सेवाकेंद्राच्या बाजूला एक उंच इमारत आहे. ८.१२.२०२२ या दिवशी त्या इमारतीच्या भिंतीत असलेल्या छोट्याशा झरोक्यातून सकाळी ८.२० ते ८.३० या अल्पाहाराच्या वेळी सूर्यनारायणाचे प्रकाशकिरण सेवाकेंद्राच्या भोजनकक्षात आले आणि त्या प्रकाशाने संपूर्ण भोजनकक्ष उजळून गेला.
अ. सूर्यनारायणाचा प्रकाश प्रथम सद़्गुरु पिंगळेकाकांच्या बाजूने त्यांच्या डोक्यावर आला आणि तिथून सेवाकेंद्राच्या भिंतीवर पसरत गेला. तेव्हा गुरुदेव, ‘आपणच प्रकाशाच्या रूपात सेवाकेंद्रात आला आहात’, असे आम्हाला जाणवले.
आ. ‘सूर्यनारायणाकडून एक दिव्य ज्योत सेवाकेंद्रात येत आहे’, असे मला दिसले. तेव्हा ‘सेवाकेंद्रातील वातावरण साक्षात् कैलासासारखे झाले’, असे आम्हाला जाणवत होते.
२. नवीन सेवाकेंद्राच्या वर गरुडाने घिरट्या घालणे
८.१२.२०२२ या दिवशी दुपारी ४.३० वाजता सेवाकेंद्रात श्री. प्रणव मणेरीकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) यांच्या हस्ते कलशाची स्थापना होणार होती. दुपारी ४ वाजता गरुडदेव सेवाकेंद्राच्या वर घिरट्या घालत होता. ‘श्रीविष्णूचे वाहन असलेला गरुडदेव ‘कलश स्थापना’ पहायला आला आहे’, असे आम्हा सर्वांना जाणवले.
३. रामनाथी आश्रमात झालेल्या ‘आयुष्य होमा’च्या संदर्भातील अनुभूती
८.१२.२०२२ या दिवशी रामनाथी आश्रमात झालेल्या ‘आयुष्य होमा’चे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.
अ. होमाच्या सूक्ष्म परीक्षणात ‘यज्ञस्थळाचे वातावरण कैलास पर्वतासारखे झाले आहे’, असे सांगण्यात आलेे. गुरुदेवा, आपण सकाळीच देहली सेवाकेंद्रातील वातावरण कैलासासारखे बनवून आम्हा सर्व साधकांना आधीच ही अनुभूती दिलीत.
आ. होमाच्या ठिकाणी दिसलेल्या सप्तरंगी प्रकाशाप्रमाणेच देहली सेवाकेंद्राच्या नवीन वास्तूमध्ये सकाळी सूर्यनारायणाच्या प्रकाशात सप्तरंग दिसत होते.
‘गुरुदेवा, आपणच आम्हाला आपल्या सगुण अस्तित्वाची अनुभूती दिल्याबद्दल आम्ही सर्व साधक आपल्या श्री चरणी अनंत कोटी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– सुश्री (कु.) पूनम चौधरी आणि देहली सेवाकेंद्रातील सर्व साधक (२०.१.२०२३)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |