पुरस्कार लोकमान्यांचा !
लोकमान्य टिळक यांच्या नावाने पुरस्कार स्वीकारण्याची पात्रता एका तरी काँग्रेसच्या नेत्यामध्ये आहे का ?
लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे येथे स्वीकारला. हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला जाणार म्हणून काँग्रेसने याविषयी स्मारकाचे विश्वस्त तथा काँग्रेसचे नेते डॉ. रोहित टिळक यांची तक्रार राहुल गांधी यांच्याकडे केली. ही तक्रार करतांना ‘नरेंद्र मोदी यांनी लोकमान्य टिळक यांचे विचार कधीपासून अंगीकारले ?’, असे म्हणत काँग्रेसने हा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना देण्यास विरोध केला. एकीकडे पुरस्कार समारंभ चालू असतांना याविरोधात काँग्रेसच्या काही समर्थकांनी आंदोलन केले, तर दुसरीकडे पुरस्कार सोहळ्याच्या व्यासपिठावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हेही होते. त्यामुळे काँग्रेसच्या या विरोधाची सर्व हवा निघून गेली. ‘हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे येथे येणार असल्याची माहिती सर्वप्रथम शरद पवार यांनी देणे, तसेच कार्यक्रमाच्या वेळी सुशीलकुमार शिंदे व्यासपिठावर उपस्थित असणे, यातून भविष्यात राजकीय समीकरणे काय असू शकतील असा संभ्रम जनतेच्या मनात निर्माण झाल्यास आश्चर्य वाटायला नको; मात्र येथे आपण या पुरस्काराला विरोध करणार्या काँग्रेसची मानसिकता पाहू. मुळात काँग्रेसवाल्यांनी केलेल्या तक्रारीची साधी नोंदही राहुल गांधी यांनी घेतली नाही. नोंद घेणार तरी कशी ? इतक्या वर्षात काँग्रेसवाल्यांनी लोकमान्य टिळक यांची प्रतिमा केवळ काँग्रेसच्या कार्यालयातील भिंतीवर लावण्यापुरती मर्यादित करण्याचे पाप केले. काँग्रेसने जर लोकमान्यांच्या विचारांचा अंगीकार केला असता, तर हा पुरस्कार मोदी यांना देण्याची वेळ काँग्रेसच्या डॉ. दीपक टिळक यांच्यावर आली नसती. ‘पंतप्रधान मोदी यांना पुरस्कार नको म्हणणार्या काँग्रेसने हा पुरस्कार कुणाला द्यावा ?’, हे सुचवले असते, तर त्यांच्या विरोधाला काही अर्थ आला असता. ‘मोदी यांना पुरस्कार नको’, तर ‘हा पुरस्कार राहुल गांधी यांना द्या’, असे म्हणण्याचे धाडस काँग्रेसवाल्यांकडे आहे का ? राहुल गांधीच काय, तर काँग्रेसच्या एकाही नेत्याकडे लोकमान्य टिळक यांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारण्याची पात्रता नाही. अशा काँग्रेसने या पुरस्कारासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावाला विरोध हा केवळ वांझोटेपणा होय.
खरेतर या पुरस्कारासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावाला विरोध करणार्या काँग्रेसला जनाची नव्हे, तर मनाची तरी लाज वाटायला हवी होती. भारताच्या स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक सत्तेत असलेल्या काँग्रेसने देशातील शेकडो योजना आणि स्मारके यांना गांधी अन् नेहरू यांची नावे दिली. काँग्रेस पुन्हा सत्तेत आली असती, तर राहुल आणि सोनिया गांधी यांची नावे देण्यासही काँग्रेसवाल्यांनी कमी केले नसते; परंतु काँग्रेसने लोकमान्य टिळक यांच्या नावाने किती योजना चालू केल्या ? हा एक सर्वेक्षणाचा विषय ठरेल. लोकमान्य टिळक असेपर्यंत काँग्रेसची ओळख ‘एक राष्ट्रनिष्ठा जोपासणारा पक्ष’ म्हणून होती; पण त्यांच्या निधनानंतर काँग्रेस पक्ष गांधी-नेहरू घराण्याचा मिंधा झाला आणि तो आजही आहे. सद्यःस्थितीत काँग्रेसची झालेली दुरवस्था ही लोकमान्यांच्या विचारांचा पुरस्कार न केल्याचाच परिणाम आहे, हे सांगण्यासाठी कुणा तज्ञाची आवश्यकता नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांना पुरस्कार नाकारण्याची मागणी करण्याऐवजी काँग्रेसवाल्यांनी राहुल गांधी यांना लोकमान्य टिळक यांच्या विचारांचा पुरस्कार करण्याची मागणी करायला हवी.
काँग्रेसने टिळक यांचे विचार किती जोपासले ?
काँग्रेसवाले स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात; परंतु त्याच सावरकर यांची विद्यार्थीदशेपासूनची प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि क्रांतीकार्य पाहून लोकमान्य टिळक यांनी श्यामजी कृष्णा वर्मा यांच्याकडे इंग्लंड येथील शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती देण्याची शिफारस केली होती. लोकमान्य टिळक काँग्रेसमधील जहाल गटातील असले, तरी त्यांना मवाळ नेत्यांविषयी आत्मीयता होती; मात्र टिळक यांच्या निधनानंतर म. गांधींनी क्रांतीकारकांचा द्वेष केला. काँग्रेस समितीने अध्यक्षपदासाठी निवडलेले नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नेतृत्व गांधींनी नेहरू प्रेमापोटी डावलले. लोकमान्य टिळक यांचे नेतृत्व प्रखर राष्ट्रवाद आणि हिंदुत्वनिष्ठा जोपासणारे होते. गांधींचे नेतृत्व मात्र मुसलमानधार्जिणे निघाले. मुसलमानांच्या प्रेमापोटी गांधींनी राष्ट्रहिताला तिलांजली दिली. खिलाफत चळवळ आणि भारताची फाळणी ही त्याचीच उदाहरणे होय. गांधीजींची ही मुसलमानधार्जिणी विचारधारा आजही काँग्रेसच्या नेतृत्वात कार्यरत आहे. यामुळे काँग्रेसने केवळ हिंदूंचीच नव्हे, तर देशाचीही न भरून निघणारी सर्वांगाने हानी केली. हा सर्व परिणाम लोकमान्य टिळक यांची विचारधारा न अंगीकारल्यामुळे आहे, याविषयी यत्किंचितही शंका बाळगण्याचे कारण नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना पुरस्कार नाकारण्यापूर्वी काँग्रेसच्या इतक्या वर्षांच्या सत्ता काळात ‘लोकमान्य टिळक यांचा प्रखर राष्ट्रवाद देशातील युवा पिढीमध्ये यावा’, यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले ? याचे उत्तर काँग्रेसवाले देऊ शकतील का ? काँग्रेसने कधीच स्वत:च्याच पक्षाचे नेते असलेल्या लोकमान्य टिळक यांना पुढे आणले नाही. काँग्रेसने केवळ न केवळ गांधी आणि नेहरू यांच्याच मुसलमानधार्जिण्या राजकारणाचा कित्ता गिरवला.
पुरस्काराच्या वेळी आंदोलन करणे, हा काँग्रेसचा कर्मदरिद्रीपणा होय. ज्यांच्या नावाने आंदोलन केले, त्या लोकमान्यांचे विचार अंगीकारले असते, तर देशातील काँग्रेसचे नेतृत्व कायम राहिले असते. याविषयी खरेतर काँग्रेसवाल्यांनी आत्मचिंतन करणे आवश्यक आहे. आज देशाला खरोखरच लोकमान्य टिळक यांच्या प्रखर राष्ट्रवादी विचारांच्या नेतृत्वाची आवश्यकता आहे. पुरस्कार स्वीकारतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेले लोकमान्य टिळक यांच्यावरील विचार अमूल्य होते. भारताने लोकमान्यांच्या विचाराने मार्गक्रमण केल्यास देशाची सर्वांगीण प्रगती कुणीही रोखू शकणार नाही, हेही तितकेच निश्चित !