एम्.आय.डी.सी.च्या पुढील वर्धापनदिनापर्यंत १० सहस्र कोटी रुपयांचा रत्नागिरीत प्रकल्प ! – पालकमंत्री उदय सामंत
१ लाख १८ सहस्र ४२२ कोटी रुपयांच्या परदेशी गुंतवणुकीने महाराष्ट्र देशात प्रथम
रत्नागिरी – गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात १ लाख १८ सहस्र ४२२ कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक राज्यातील उद्योगांमध्ये झाली असून, यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. एम्.आय.डी.सी.च्या पुढील वर्धापनदिनापर्यंत १० सहस्र कोटी रुपयांचा प्रकल्प रत्नागिरीत असेल, अशी अपेक्षा पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली. एम्.आय.डी.सी.च्या ६१ व्या वर्धापनदिन सोहळ्यात ते बोलत होते.
पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात १ लाख १८ सहस्र ४२२ कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक आणू शकलो, यात एम्.आय.डी.सी.च्या अधिकारी आणि कर्मचारी यांचा मोठा वाटा आहे. दावस येथे झालेल्या सामंजस्य करारापैकी १ लाख ६ सहस्र उद्योगांना जागा दिली आहे. एम्.आय.डी.सी.च्या अधिकार्यांना त्याविषयी धन्यवाद देतो. निश्चितच ते सत्काराला पात्र आहेत. सर्वसामान्य माणसाला त्रास होता कामा नये, हे एम्.आय.डी.सी. ने जपलयं. स्थानिकांना प्राधान्याने काम दिले पाहिजे, त्यांना जगवले पाहिजे, त्या घटकाला वंचित ठेवू नये, अशी भूमिका उद्योजकांनी घेतली पाहिजे.’’