२६ जानेवारीपर्यंत लोकमान्य टिळक जन्मस्थान स्मारकाचे काम पूर्ण होणार! – पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी – येथील लोकमान्य टिळक जन्मस्थान स्मारकाच्या सुशोभिकरणाचे काम २६ जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण होणार आहे. त्या दिवशी हे स्मारक लोकार्पण करण्याचा मनोदय आहे, असे उद्गार पालकमंत्री उदय सामंत यांनी काढले. लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या येथील जन्मस्थानी असलेल्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पालकमंत्री सामंत यांनी विनम्र अभिवादन केले. त्या वेळी ते बोलत होते. पालकमंत्री सामंत यांनी स्मारकाची पहाणी केली आणि लवकरात लवकर सुशोभिकरणाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्यांना दिल्या. या वेळी प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
उदय सामंत म्हणाले, ‘‘ऐतिहासिक वास्तूच्या सुशोभिकरणासाठी साडेचार कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्याचे कामही चालू आहे. २६ जानेवारीपर्यंत हे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. लोकमान्य टिळकांसारखे कणखर नेतृत्व रत्नागिरीतून तयार झाले, याचा आम्हाला अभिमान आहे.’’