सिंधुदुर्ग : ‘ऑनलाईन’ अर्जातील चुकांमुळे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभापासून अनेक लाभार्थी वंचित !
कुडाळ – केंद्रशासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांच्या सूचीत परराज्यातील लाभार्थी आढळल्याने शासनाकडून याची पडताळणी प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. प्राथमिक पडताळणी प्रक्रियेत काही संशयास्पद लाभार्थ्यांना अपात्र ठरवून देय लाभ वसुलीची कार्यवाही जिल्हाधिकारी स्तरावरून प्रस्तावित करण्यात आली आहे. या योजनेसाठीचे ‘ऑनलाईन’ अर्ज शासकीय कर्मचार्यांकडून सदोष भरले गेल्यामुळे असे लाभार्थी कायमस्वरूपी अपात्र ठरण्याच्या मार्गावर आहेत, असे मनसेचे पदाधिकारी आणि शेतकरी यांच्या शिष्टमंडळाने कुडाळ प्रांताधिकारी श्रीमती ऐश्वर्या काळुसे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिलेली सूत्रे . . .
१. काही गावांमधील लाभधारक शेतकर्यांची ‘ऑनलाईन’ माहिती सदोष भरली गेल्याने ते तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरले आणि त्यांना लाभ देण्याचे थांबवण्यात आले आहे.
२. शासकीय यंत्रणेच्या चुकांमुळे अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित रहाणार आहेत. त्यामुळे अशा लाभार्थ्यांची ‘ऑनलाईन पोर्टल’वरील माहिती वेळीच अद्ययावत करावी, अन्यथा ते लाभार्थी कायमस्वरूपी अपात्र ठरले जाऊ शकतात.
३. शेतकर्यांच्या ‘ऑनलाईन’ प्रस्तावांमधील चुका तात्काळ दुरुस्त करण्याची प्रक्रिया तहसील स्तरावर करण्यात यावी आणि अशा लाभार्थ्यांना मिळणारा लाभ गणेशोत्सवापूर्वी देण्यात यावा.
या निवेदनाची नोंद घेऊन प्रांताधिकारी काळुसे यांनी ‘योग्य कार्यवाही करण्यात येईल’, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.