वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या निमित्त रामनाथी आश्रमात झालेल्‍या धर्मध्‍वजाच्‍या पूजनाच्‍या वेळी पू. (सौ.) संगीता जाधव यांना सूक्ष्मातून दिसलेले दृश्‍य !

‘१४.६.२०२३ या दिवशी महर्षींच्या आज्ञेने वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या निमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या शुभहस्ते धर्मध्‍वजाचे पूजन झाले. त्यावेळी पू. (सौ.) संगीता जाधव यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत. 

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. धर्मध्‍वजाचे पूजन चालू असतांना सूर्य उगवल्‍यानंतर दिसणार्‍या प्रकाशाप्रमाणे प्रकाश दिसणे

‘धर्मध्‍वजाचे पूजन चालू असतांना तेथे सगळे संत एकत्रित उभे होते. त्‍या वेळी मला मोठ्या प्रमाणात केशरी प्रकाश दिसत होता. पहाटे सूर्य उगवल्‍यानंतर केशरी प्रकाश दिसतो, तसा प्रकाश मला जाणवत होता. काही वेळा मला प्रकाश दिसतो, त्‍यापेक्षा हा प्रकाश निराळा होता.

२. सूक्ष्मातून दिसलेले दृश्‍य

पू. (सौ.) संगीता जाधव

२ अ. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ धर्मध्‍वजाचे पूजन करतांना सूक्ष्मातून दिसलेले दृश्‍य

२ अ १. धर्मध्‍वजाच्‍या खांबामध्‍ये श्रीविष्‍णुस्‍वरूप गुरुदेव (परात्‍पर गुरु डॉ. आठवले) दिसणे आणि ‘त्‍यांचेच पूजन होत आहे’, असे जाणवणे : श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ धर्मध्‍वजाचे पूजन करतांना तेथील खांबामध्‍ये मला श्रीविष्‍णुस्‍वरूप गुरुदेव (परात्‍पर गुरु डॉ. आठवले) दिसत होते. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ धर्मध्‍वजाला गंध लावून फुले वहात होत्‍या. तेव्‍हा त्‍या ‘गुरुदेवांचीच पूजा करत आहेत’, असे मला दिसत होते.

२ अ २. नंतर मला त्‍या खांबामध्‍ये गुरुदेवांच्‍या ठिकाणी वेगवेगळ्‍या देवतांच्‍या मूर्तींचे दर्शन झाले. ‘त्‍या सर्व देवतांचेही पूजन होत आहे’, असे मला दिसत होते. त्‍यातील एक मूर्ती त्‍या खांबामध्‍ये मोठ्या सिंहासनावर विराजमान होती. ‘ती ध्‍वजदेवता असावी’, असे मला जाणवले.

२ अ ३. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ धर्मध्‍वजाचे पूजन करतांना एवढ्या एकरूप झाल्‍या होत्‍या की, त्‍यांचे स्‍थुलातील अस्‍तित्‍व न्‍यून होऊन त्‍यांच्‍या ठिकाणी मला त्‍यांची प्रकाशमान आकृती दिसू लागली.

२ अ ४. आकाशातून सूक्ष्मातून सर्व देवता, ऋषिमुनी, सर्व चांगल्‍या शक्‍ती, गंधर्व, किन्‍नर आणि अप्‍सरा धर्मध्‍वजाच्‍या पूजनाचा सोहळा बघत असल्‍याचे जाणवणे : धर्मध्‍वजाचे पूजन होत असतांना स्‍थुलातून सर्व संत आणि साधक एकत्र जमले होते. त्‍याच वेळी आकाशामध्‍ये मोठ्या प्रमाणात सर्व देवता, ऋषिमुनी, सर्व चांगल्‍या शक्‍ती, गंधर्व, किन्‍नर, अप्‍सरा मंडल करून हे दृश्‍य बघत होते. सर्व ऋषिमुनींचे प्रथम मोठे गोल मंडल होते. तेही शांतपणे सर्व पूजा बघत होते. त्‍याच्‍या नंतरच्‍या मंडलात अनेक देवता होत्‍या. त्‍यांच्‍यानंतर अन्‍य ब्रह्मांडातील सर्व जीव पुष्‍कळ संख्‍येने होते. एकीकडे तेथे वेगवेगळ्‍या दिशेने आणखी देवता येत होत्‍या. त्‍या वेळी मला ‘किती मोठा महोत्‍सव आहे !’, असे वाटत होते. सूक्ष्मातून सगळे आकाश भरले होते आणि तेथे वेगळे स्‍वरूप निर्माण झाले होते. सर्व जण भव्‍य-दिव्‍य कार्यक्रम अनुभवत होते.

२ आ. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ ध्‍वजारोहण करत असतांना त्‍यांच्‍या हाताच्‍या ठिकाणी प.पू. गुरुदेवांचा हात दिसणे : श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ ध्‍वजारोहण करत होत्‍या. तेव्‍हा मला त्‍यांच्‍या दोरी ओढणार्‍या हाताच्‍या ठिकाणी प.पू. गुरुदेवांचा हात दिसत होता. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ दोरी ओढत असतांना त्‍यांची गुरुदेवांशी एवढी एकरूपता झाली की, ‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांचा हात हा प.पू. गुरुदेवांचा हात आहे’, असे मला जाणवत होते.’

– (पू.) सौ. संगीता जाधव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.६.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक