युक्रेनकडून रशियावर ड्रोनद्वारे आक्रमण !
रशियाच्या आक्रमकतेचे दिवाळे निघाल्याची युक्रेनची टीका !
कीव्ह (युक्रेन) – रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध चालू होऊन दीड वर्ष झाले असून युक्रेन आक्रमक झाल्याचे प्रथमच दिसत आहे. युक्रेनने रशियाची राजधानी मॉस्कोवर तीन ड्रोनद्वारे आक्रमण केले. यांतील एक ड्रोन रशियाने नष्ट केले, तर अन्य दोन ड्रोन निकामी करण्यात आले, असे रशियाचे म्हणणे आहे.
(सौजन्य : CNN)
युक्रेनच्या या आक्रमणावर त्याचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी रशियाला चेतावणी देत म्हटले की, युद्ध हळूहळू तुमच्या दिशेने येत आहे. युद्धाच्या मैदानावर रशियाच्या आक्रमकतेचे दिवाळे निघाले असून युक्रेन अधिक कणखर होत आहे. झेलेंस्की पुढे म्हणाले की, आज रशियाच्या कथित विशेष सैन्य अभियानाचा ५२२ वा दिवस असून रशियन सैन्य मैदानावर आणखी एक किंवा दोन आठवडेच टिकू शकते. रशियाने या आक्रमणाला ‘आतंकवादी आक्रमण’ म्हटले आहे.
आमच्यावर आक्रमण होत असतांना आम्ही युद्धविरामचा विचार करू शकत नाही ! – व्लादिमिर पुतिन
रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धविरामावर चर्चा होऊ शकते; परंतु त्यासाठी युक्रेनने आक्रमण थांबवले पाहिजे. आमच्यावर आक्रमण होत असतांना आम्ही युद्धविरामचा विचार करू शकत नाही, असे वक्तव्य रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केले.
संपादकीय भूमिकारशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे पाश्चात्त्य देशांनी रशियावर निर्बंध लादले, तसेच रशियावर आर्थिक बहिष्कार घालण्यासाठी भारतावरही दबाव आणला. आता युक्रेनकडून रशियावर आक्रमण केले जात असतांना मूग गिळून गप्प बसणार्या पाश्चात्त्य देशांना भारताने आरसा दाखवला पाहिजे ! |