नसरापूर येथे (पुणे) भूस्खलन होण्याची शक्यता !
बनेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता तात्पुरता बंद !
भोर (जिल्हा पुणे) – येथील बाजारपेठेमधून बनेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता २६ जुलै या दिवशी सायंकाळी ५ नंतर खचला. या वेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम शाखा अभियंता, मंडलाधिकारी आणि नसरापूर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन पुढील धोका ओळखून रस्ता वाहतुकीस तात्पुरता बंद केला आहे. त्याभोवती बांबूचे सुरक्षाकडे उभारण्यात आले आहे, तसेच रस्ता बंद असल्याविषयीची सूचना बनेश्वर चौकात ग्रामपंचायतीच्या वतीने लावण्यात आली आहे. नसरापूरला भूस्खलन होण्याची शक्यता बांधकाम विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे.
भोर तालुक्यातील नसरापूर येथील श्री क्षेत्र बनेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता शिवगंगा नदीच्या पात्रालगत आहे. हा धोकादायक रस्ता नदीपात्रालगत असून नदीपात्रापासून अनुमाने १५० फुटांपेक्षा अधिक उंचीवर आहे. या मातीच्या रस्त्याच्या डाव्या बाजूस खोल दरी असून रस्त्याच्या उजव्या बाजूस खासगी शेतभूमी आहे. या रस्त्यालगत वाहनांना अपघात होऊ नये, याकरता जिल्हा परिषदेकडून संरक्षक भिंत उभारलेली आहे. अनेक वर्षे रस्ता धोकादायक असतांना आजतागायत येथून बनेश्वर, केळवडेकडे जाणारा रस्ता अव्याहतपणे चालू आहे.