रेल्वे पोलिसाकडून पोलीस अधिकारी आणि प्रवासी यांच्यावर गोळीबार : ४ जणांचा मृत्यू !
मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेसमधील धक्कादायक प्रकार !
मुंबई – जयपूर येथून मुंबईला जाणार्या जयपूर एक्सप्रेसच्या ‘बी ५’ या डब्यामध्ये ३१ जुलै या दिवशी पहाटे रेल्वे सुरक्षा दलाचा हवालदार चेतन सिंह याने पोलीस अधिकारी आणि प्रवासी यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये रेल्वे सुरक्षा दलाचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक टीकाराम मीणा आणि ३ प्रवासी यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी चेतन सिंह याला अटक केली आहे. सर्व मृतदेह कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठण्यात आले आहेत.
(सौजन्य : ANI News)
या प्रकरणी लोहमार्ग पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यानुसार,
१. चेतन हा उत्तरप्रदेशातील हाथरस येथील असून काही दिवसांपूर्वीच त्याचे मुंबई येथे स्थानांतर झाले होते.
२. तो मध्यरात्री २.५० वाजता चेतन सूरत रेल्वेस्थानकावर मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये चढला. त्याच्यासमवेत आणखीही २ हवालदार होते. साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक टीकाराम मीणा हे त्यांच्या गटाचे नेतृत्व करत होते.
३. जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस मुंबई सेंट्रल या स्थानकावर त्याने चौघांवर गोळीबार केला.
४. यानंतर ही गाडी मीरारोड स्थानकावर पोचवण्याच्या काही मिनिटे आधी एका प्रवाशाने आपत्कालीन साखळी ओढून गाडी थांबवली. गाडी थांबल्यानंतर चेतन सिंह याने रेल्वेतून उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला; पण त्याला रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांनी पकडले.
५. ज्या डब्यामध्ये गोळीबार झाला, त्या प्रवाशांकडून पोलिसांनी माहिती घेतली. पोलिसांकडून अन्वेषण चालू आहे.