काही मिनिटांच्‍या सहवासात प्रीतीने सर्वांना आपलेसे करणारे आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टरांचे प्रतिरूप भासणारे सनातनचे ७५ वे संत पू. रमानंद गौडा !

पू. रमानंद गौडा

१. कर्नाटकातील क्षेत्रे पहाण्‍यास जाण्‍यापूर्वी मंगळुरू येथे जाणे, तेथे पू. रमानंद गौडा यांची भेट होऊन त्‍यांनी आपुलकीने विचारपूस केल्‍याने भावजागृती होणे

‘काही दिवसांपूर्वी माझे आई-बाबा (सौ. अंजली आणि श्री. श्रीराम काणे) आणि मी आमच्‍या काही नातेवाइकांसह कर्नाटकातील काही क्षेत्रे पहाण्‍यासाठी गेलो होतो. सगळे जण वेगवेगळ्‍या ठिकाणांहून येणार होतेे. मध्‍ये थोडा वेळ असल्‍याने आम्‍ही मंगळुरू येथे गेलो. त्‍या वेळी पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे संत, वय ४७ वर्षे) अध्‍यात्‍मप्रसारासाठी दौर्‍यावर जाण्‍यास निघाले होते. ते दौर्‍यावर जाण्‍याच्‍या घाईत होते, तरीही त्‍यांनी आमची आपुलकीने विचारपूस केली आणि आमच्‍याशी बोलण्‍यासाठी बराच वेळही दिला. आमचे पुढील नियोजन विचारून त्‍यांनी आम्‍हाला स्‍थानिक मंदिरे आणि प्रेक्षणीय स्‍थळे यांची नावे लिहून दिली. ‘कोणत्‍या स्‍थळानंतर काय पहायचे ? कोणकोणत्‍या गावांत साधक आहेत ? आम्‍ही

कुणाकडे जाऊ शकतो ?’, याविषयीही त्‍यांनी आम्‍हाला सांगितले. तेवढ्यावरच न थांबता त्‍यांनी एका साधकाला आमच्‍या वाहनचालकाकडे पाठवले आणि ‘आम्‍हाला मंगळुरूतील कोणती मंदिरे दाखवायची’, याची कन्‍नडमधे माहिती देेण्‍यास सांगितले. त्‍यांचे प्रेम पाहून आमची भावजागृती झाली.

कु. गीतांजली काणे

२. साधकांना प्रत्‍येक गोष्‍टीतून आनंद आणि चैतन्‍य देण्‍याचा सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍यातील गुण पू. रमानंदअण्‍णा यांच्‍यामध्‍येही अनुभवणे

पू. रमानंदअण्‍णा सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टरांचे प्रतिरूपच भासले. पूर्वी गुरुदेव गोव्‍यात येणार्‍या साधकांना गोवा पहाण्‍यासाठी पाठवायचे आणि भेटीत त्‍याविषयी विचारायचे. आताही गोव्‍यातील प्रसिद्ध शिमगोत्‍सव पहाण्‍यास जाण्‍यासाठी ते साधकांचे नियोजन करण्‍यास सांगतात. सर्व साधकांना आपले कुटुंबीयच समजून त्‍यांना प्रत्‍येक गोष्‍टीतून आनंद आणि चैतन्‍य देण्‍याची, त्‍यांच्‍याशी पूर्ण समरस होण्‍याची विलक्षण हातोटी गुरुदेवांकडे आहे. पू. रमानंद अण्‍णांमधेही आम्‍हाला याच गुणांचे दर्शन झाले.

काही मिनिटांच्‍या सत्‍संगात पू. रमानंद अण्‍णांंमधील प्रीती, भाव आणि नम्रता अनुभवता आली. चार दिवसांनी आम्‍ही परत जाणार होतो. त्‍या वेळी मंगळुरू येथे महाप्रसाद अन् विश्रांती घेण्‍यास येण्‍याचे अगत्‍याने सांगून ‘साधक तुम्‍हाला रेल्‍वेस्‍थानकावर पोेचवतील’, असे त्‍यांनी सांगितले. खरेतर आम्‍ही तीन वेगवेगळ्‍या वेळी निघणार होतो, तरी त्‍यांनी आम्‍हाला मंगळुरू येथे येण्‍यास सांगितले. निघतांना तिघांना वेगवेगळा प्रसाद दिला. मी रामनाथी आश्रमातच परतणार होते, तरी त्‍यांनी सर्वांना प्रसाद देण्‍याचा निरोप देऊन ठेवला होता. खरेतर आम्‍ही फिरायला म्‍हणून गेलो होतो. आमचे नातेवाईक सनातन संस्‍थेच्‍या मार्गदर्शनानुसार साधना करणारे नव्‍हते, तरी गुरुदेवांच्‍या कृपेने प्रारंभीच संतांचे दर्शन होऊन पुढील सर्व प्रवास निर्विघ्‍नपणे आणि चैतन्‍यात झाला. काही मिनिटांच्‍या सहवासात सनातनच्‍या संतांमधील अनुपम प्रीती सर्वांना अनुभवण्‍यास मिळाली.

‘गुरुदेवा, आमची पात्रता नसतांना तुम्‍ही क्षणोक्षणी आमच्‍यावर कृपादृष्‍टी ठेवली, यासाठी आम्‍ही तुमच्‍या चरणी कृतज्ञ आहोत.’

– कु. गीतांजली काणे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.५.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक