बंदी नसलेल्या पुस्तकातील लिखाण वाचून दाखवणे कायद्याने गुन्हा ठरत नाही ! – अजय सिंह सेंगर, महाराष्ट्र प्रमुख, करणी सेना
पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवल्याचे प्रकरण
मुंबई – प्रा. के. ए.स्. नारायणाचार्य यांच्या पुस्तकातील लिखाण आणि घोष यांच्या ‘द कुराण अँड द काफिर’ या पुस्तकावर शासनाने बंदी घातलेली नाही. त्यामुळे या पुस्तकातील लिखाण वाचून दाखवणे कायद्याने गुन्हा ठरत नाही, असे मत करणी सेनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले. पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवल्याच्या प्रकरणी त्यांनी हे मत व्यक्त केले. गांधींचा एवढा पुळका होता, तर काँग्रेसने या पुस्तकावर बंदी का घातली नाही ?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
या प्रसिद्धीपत्रकात अजय सिंह सेंगर यांनी म्हटले आहे की,
१. गुन्हा नोंद होऊ शकत नाही, हे ठाऊक असूनही अमरावती येथील राजापेठ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी आदरणीय संभाजी भिडेगुरुजी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवणे हे अतिशय अयोग्य आणि घटनाविरोधी कृत्य आहे.
२. पू. भिडेगुरुजी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवणे हा राज्यघटनेचा अपमान होय. आदरणीय संभाजी भिडेगुरुजी यांच्यासारख्या व्यक्तींनी हिंदु धर्मातील लाखो तरुणांना व्यसनमुक्त केले. त्यांना धर्म आणि राष्ट्र कार्य करण्यास प्रवृत्त केले.
३. एखाद्या पुस्तकाचे वाचन करणे, हा गुन्हा होत नसतो आणि शासनाने बंदी घातलेली नसल्यामुळे त्या पुस्तकाचे वाचन करणे ही कायदेशीर कृती होय. तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक भाग आहे.
४. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, शरद पवार, जितेंद्र आव्हाड यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरुद्ध गलिच्छ भाषेचा उपयोग केला होता. त्या वेळेस त्यांच्यावर गुन्हा का नोंदवण्यात आला नाही ?
५. गांधींचा एवढा पुळका होता, तर काँग्रेसने या पुस्तकावर बंदी का घातली नाही ? या वेळीही काँग्रेसने या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केलेली नाही. यावरून काँग्रेसचे गांधीप्रेम हे फसवे आहे.
६. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आणि यशोमती ठाकूर, जितेंद्र आव्हाड यांनी पू. भिडेगुरुजी यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला असल्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा नोंदवणे आवश्यक आहे. विधानसभेच्या अध्यक्षांनी या आमदारांना निलंबित करणे आवश्यक आहे.
पू. भिडेगुरुजी यांना ‘झेड् प्लस’ सुरक्षा प्रदान करावी !
हिंदुविरोधी शक्तींपासून पू. भिडेगुरुजी यांच्यावर प्राणघातक आक्रमण होऊ शकते. त्यामुळे सरकारने पू. भिडेगुरुजी यांना ‘झेड् प्लस’ सुरक्षा प्रदान करावी. त्यांच्याविरुद्ध दबावाखाली आणि खोट्या माहितीच्या आधारे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे हा गुन्हा रहित करण्यात यावा आणि गुन्हा नोंदवणार्या पोलीस अधिकार्यांना त्वरित निलंबित करण्यात यावे, अशी मागणीही अजय सिंह सेंगर यांनी केली आहे.