मनावरील नियंत्रणानेच ‘जंक फूड’ (पिझ्झा, बर्गर, फ्रँकी असे पदार्थ) खाण्याची सवय सोडू शकतो ! – संशोधन
‘जंक फूड (पिझ्झा, बर्गर, फ्रँकी असे विविध पदार्थ) खाणे, ही आता सामान्य गोष्ट झाली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ‘जंक फूड’ आवडते. इतकेच नाही, तर अनेकांना याचे दुष्परिणाम ठाऊक असूनही ते हे पदार्थ नेहमी खातात. अनेकांना एक प्रकारे या पदार्थांची सवयच लागली आहे; पण हे पदार्थ खाण्यापासून अनेकांना स्वत:ला रोखताही येत नाही. हे पदार्थ खाण्याची सवय का सोडता येत नाही ? याचा खुलासा एका संशोधनामधून करण्यात आला आहे. त्यानुसार जंक फूड खाण्याची सवय ही तंबाखू किंवा नशा या सवयींसारखी असते. ही सवय केवळ तरुणांमध्येच नाही, तर लहान मुलांमध्येही बघायला मिळते. इतकेच काय, तर जंक फूड अनेकांच्या आहारातील महत्त्वाचा भाग आहे.
१. सवय का लागते ?
‘जंक फूड’मध्ये अधिक प्रमाणात कार्बोहायड्रेट, चरबी (फॅट) आणि साखर (शुगर) असते. यातील अधिकाधिक तळून सिद्ध केल्या जाणार्या पदार्थांमध्ये पिझ्झा, बर्गर, फ्रँकी, चॉकलेट, पेस्ट्रीज इत्यादींचा समावेश होतो; पण याच पदार्थांमुळे आरोग्याविषयी वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. सामान्यपणे जंक फूडमध्ये आढळणारी शुगर, फॅट आणि इतर गोष्टी यांमुळे आपल्याला या पदार्थांची सवय लागते. शुगर आणि फॅट यांचे अधिक प्रमाणात सेवन केल्याने आपल्या शरिरात ‘डोपामिन’ नावाचे रसायन सुटते. यामुळे व्यक्तीला फार चांगले जाणवते. असे करता करता या पदार्थांची आपल्याला सवय लागते.
२. या पदार्थांची सवय का सुटत नाही ?
‘ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ तस्मानिया’ने प्रकाशित केलेल्या ‘पेटिट’ मासिकामध्ये याचे कारण सांगण्यात आले आहे. जंक फूडची सवय का सोडवली जात नाही ? हे जाणून घेण्यासाठी ५० व्यक्तींच्या दैनंदिन जीवनावर १० दिवस निरीक्षण करण्यात आले. यात त्यांचा स्वभाव, खाण्याच्या सवयी, सामाजिक सुसंवाद (सोशल इंटरअॅक्शन) आणि त्यांची वागणूक यांवर लक्ष ठेवण्यात आले होते.
त्यानंतर या अभ्यासातून हे स्पष्ट झाले की, जंक फूडची सवय का सोडवली जात नाही ? या अभ्यासात म्हटले आहे की, घरचे जेवण ही सर्वांची कमजोरी आहे. सर्वांनाच घरचे जेवण आवडते; मात्र सध्याच्या धावपळीच्या जीवनामुळे घरी जेवण सिद्ध करण्यासाठी अनेकांकडे वेळच नाही. इथेच जंक फूड आपले काम करून जाते. मेट्रो स्थानकापासून ते आस्थापन, कार्यालय, विमानतळ, उपाहारगृहे आणि रस्ते आदी सगळीकडेच जंक फूड सहज उपलब्ध होतात. त्यामुळे अनेक जण हे पदार्थ खाण्याची सवय सोडू शकत नाही. अशात या पदार्थांपासून सुटका मिळवण्यासाठी हे पदार्थ तुम्ही जिथे अधिक वेळ घालवता, त्या ठिकाणापासून दूर ठेवा, उदाहरणार्थ तुमच्या आस्थापनाचे कार्यालय (ऑफिस).
३. सवय सोडण्यासाठी काय करू शकता ?
हे पदार्थ खाण्याची सवय लागण्याचे आणखी एक कारण म्हणजे स्वतःचा स्वभाव. तुम्ही अप्रसन्न, निराश, दु:खी असाल, तर जंक फूड अधिक खाता; मात्र तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण मिळवले, तर या पदार्थांच्या सेवनावरही नियंत्रण मिळवता येऊ शकते. या पदार्थांची सवय सोडवण्यासाठी हे जाणून घेणे आवश्यक आहे की, तुम्ही जंक फूड का आणि कधी खाता ? तसेच या पदार्थांकडे तुम्ही कधी आकर्षित होता ? हेही जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. या सर्व गोष्टींचा विचार केल्यावर आणि मनावर नियंत्रण ठेवल्यावरच जंक फूडची सवय सोडता येऊ शकते.
– डॉ. प्रमोद ढेरे
(साभार : सामाजिक माध्यम)