पुण्यात अटक केलेल्या आतंकवाद्यांकडे सापडली संवेदनशील स्थळांची छायाचित्रे !
‘ड्रोन’सह बाँब बनवण्याचे साहित्य सापडल्याची ‘ए.टी.एस्.’ची माहिती !
पुणे – राजस्थानमधील जयपूर शहरात बाँबस्फोट घडवून आणण्याच्या सिद्धतेत असलेल्या ‘अल् सुफा’ या आतंकवादी टोळीशी संबंधित दोघा आतंकवाद्यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. या दोघांनी कुलाब्यातील ‘छाबड हाऊस’ची पहाणी केल्याची माहिती समोर आली आहे. आता त्यांच्याकडे सापडलेल्या भ्रमणसंगणकात (लॅपटॉपमध्ये) ‘गुगल लोकेशन’चे (इंटरनेटद्वारे दिसणारा ठावठिकाणा) ‘स्क्रीनशॉट’ (छायाचित्रे) सापडले असून त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणांचा समावेश आहे. हे दोघे विविध प्रकारची पुस्तके वाचून, ‘युट्यूब’चे ‘व्हिडिओ’ पाहून प्रेरित झाले होते. महत्त्वाचे म्हणजे, त्या दोघांकडे ‘ड्रोन’सह बाँब बनवण्याचे साहित्य सापडले असल्याची माहिती ‘ए.टी.एस्.’च्या वरिष्ठ अधिकार्यांनी दिली.
हे दोन्ही आतंकवादी ‘ग्राफीक डिझायनर’ असल्याचे भासवत होते; परंतु त्यांचे प्रत्यक्षात बारावीपर्यंतही शिक्षण झालेले नव्हते. ते प्रशिक्षित आतंकवादी असून त्यांनी बाँब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. ते प्रत्यक्षात आतंकवादी कारवायांसाठीच पुण्यात आले होते. त्यांना आश्रय देणार्या पठाण याचाही ‘ग्राफीक्स डिझायनिंग’चा व्यवसाय नसून तो त्याआडून दोघा आतंकवाद्यांना साहाय्य करत असल्याचे पुढे आले आहे. त्यांना यासाठी लागणारे पैसे अटक केलेला अन्य एक आतंकवादी सिमाब काझी पुरवत होता. त्याच्या पैशांवरच तिघेही मागील दीड वर्ष पुण्यात राहून ठिकठिकाणची पहाणी, बाँबस्फोटाची चाचणी आणि संवेदनशील ठिकाणांची माहिती मिळवत होते. या प्रकरणी ए.टी.एस्.ने आतापर्यंत ४ आतंकवाद्यांना अटक केली असून राज्यात, तसेच परराज्यांत पसार आतंकवाद्यांचा शोध चालू आहे.
Mumbai Police have ramped up security at the Chabad House in Colaba after discovering pictures of the center with arrested terror suspects from the Maharashtra Anti Terrorism Squad. @ZvikaKlein reports: https://t.co/nNT8n96UFu
— The Jerusalem Post (@Jerusalem_Post) July 31, 2023
अनेक संघटनांवर बंदी आणूनही बाँबस्फोट थांबलेले नाहीत ! – ए.टी.एस्.चे माजी अधिकारी भानुप्रताप बर्गे
ए.टी.एस्.चे माजी अधिकारी भानुप्रताप बर्गे यांनी सांगितले की, पुण्यात वर्ष २०१० मध्ये जर्मन बेकरी, त्यानंतर वर्ष २०१२ मध्ये जंगली महाराज आणि त्यानंतर वर्ष २०१४ मध्ये फरासखाना येथे बाँबस्फोट करण्यात आले. यानंतर देशातील काही घटनांचे पुण्याशी धागेदोरे असल्याचे समोर येऊ लागले. विशेष म्हणजे, ज्या ज्या संघटनेच्या माध्यमातून हे कृत्य घडवले गेले, त्याची एकूणच माहिती घेतल्यास ‘केवळ संघटनेचे नाव पालटलेले असे; परंतु काम तेच असते’, असे लक्षात येते. अनेक संघटनांवर बंदी आणूनही नवीन संघटना सिद्ध करून आतंकवाद्यांकडून बाँबस्फोट केले जात आहेत.
उच्चशिक्षित आणि धार्मिक युवा वर्ग आतंकवाद्यांचे माध्यम !
आतंकवादी संघटना सहसा युवकांना लक्ष्य करतात. जे तरुण-तरुणी उच्चशिक्षित आहेत आणि ज्यांना धर्माची आवड आहे, अशांना माध्यम बनवले जाते. त्यांची दिशाभूल करून माथी भडकवली जातात आणि त्यांच्याकडून विघातक कृत्ये करवून घेतली जातात.
सिमाब काझी हा आतंकवादी मेकॅनिकल इंजिनियर !
कोथरूडमध्ये अटक करण्यात आलेला, रत्नागिरीतील सिमाब नसरुद्दीन काझी याला न्यायालयात उपस्थित केले असता ५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सिमाब काझी हा मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील पंढरी गावाचा आहे. तो ‘मेकॅनिकल इंजिनियर’ आहे. तो एका नामांकित आस्थापनात कामाला असून त्याला वार्षिक १५ लाख रुपये पगार आहे. तो पुण्यातील कोंढवा भागात रहायला आहे. साहाय्यक पोलीस आयुक्त अरुण वायकर यांनी न्यायालयात सांगितले की, सिमाब काझी याने अब्दुल पठाण याच्या अधिकोषातील खात्यात पैसे पाठवले. ते पैसे पुढे महंमद खान आणि महंमद साकी यांना आतंकवादी कारवायांसाठी दिले गेले. सिमाबने किती पैसे दिले ?, अजून त्याला कुणी साहाय्य केले आहे का ? यांचे अन्वेषण चालू आहे.
आंबोलीच्या घनदाट जंगलात बाँबस्फोटाची चाचणी !
आंबोलीच्या घनदाट जंगलात बाँबस्फोटाची चाचणी केली होती. हे आतंकवादी ४ दिवस आंबोलीच्या जंगलात वास्तव्यास होते. ते रहाण्यासाठी ‘लॉज’ किंवा हॉटेलचा वापर करत नव्हते, तर तेथेच तंबू ठोकून रहात होते. या ठिकाणाची ‘ए.टी.एस्.’ने पहाणी केली.