पाकिस्तानातील आत्मघातकी आक्रमणात ‘इस्लामिक स्टेट’चा हात !

घटनास्थळ

इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये ३० जुलैच्या दिवशी खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बाजौर येथे एका राजकीय सभेच्या वेळी झालेल्या आत्मघातकी आक्रमणात आतापर्यंत ४४ जण ठार, तर २०० लोक घायाळ झाले आहेत. प्राथमिक अन्वेषणात या आत्मघातकी आक्रमणाच्या मागे ‘इस्लामिक स्टेट’ या आतंकवादी संघटनेचा हात असल्याचे समोर आले आहे. खार शहरात सत्ताधारी आघाडीचा मित्रपक्ष असलेल्या जमियत उलेमा इस्लाम-फजलची सभा चालू असतांना हे आत्मघातकी आक्रमण झाले होते.

या प्रकरणी पाकिस्तानच्या पोलिसांनी ३ संशयितांना कह्यात घेतले असून त्यांची चौकशी चालू आहे. खैबर पख्तुनख्वा प्रांताचे पोलीस प्रमुख अख्तर खान यांनी सांगितले की, स्फोटात १० किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला होता. आत्मघाती आक्रमण करणारा गर्दीत अगदी समोर व्यासपिठाच्या जवळ उभा होता. या आक्रमणात जमियत उलेमा इस्लाम-फजलच्या अनेक नेत्यांचा मृत्यू झाला आहे. बाजौर परिसर पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर आहे आणि येथे तालिबानचा प्रभाव असल्याचे मानले जाते. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांच्या मते हे आक्रमण म्हणजे देशाला कमकुवत करण्याचे षड्यंत्र आहे.

संपादकीय भूमिका

पाकिस्तानने आतंकवाद पोसला. त्यामुळे त्याने जे पेरले, तेच आता उगवत आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?