युसूफला ‘काका’ मानले आणि त्याने माझा विश्वासघात केला ! – पीडित युवती, गोवा
लैंगिक अत्याचार करणार्या युसूफला युवतीने धडा शिकवल्याचे प्रकरण
म्हापसा, ३० जुलै (वार्ता.) – ‘त्या’ नराधमाला मी काका मानले आणि त्याने माझा विश्वासघात केला’, असा आक्रोश म्हापसा येथील प्रकरणातील पीडित युवती करत आहे. या युवतीला अज्ञातस्थळी नेऊन म्हापसा येथील युसूफ शेख (वय ४० वर्षे) याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडित विद्यार्थिनीने याचा सूड उगवण्यासाठी युसूफ शेख याला म्हापसा येथे एका ठिकाणी बोलावून त्याच्या तोंडावर भर रस्त्यात ‘स्प्रे’ आणि मिरची पूड मारून त्याला यथेच्छ चोप दिला. पीडित युवती या मानसिक धक्क्यातून अजूनही सावरलेली नाही. महाविद्यालयातील शिक्षकांनी तिच्या घरी भेट दिली असता मुलीने टाहो फोडत तिची व्यथा सर्वांसमोर मांडली.
संबंधित युवती बार्देश तालुक्यात एका महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिकते. ती गरीब घराण्यातील आहे. ती विद्यालयात ‘बॉक्सर’ (मुष्टीयोद्धा) म्हणून प्रसिद्ध आहे. महाविद्यालयीन ‘बॉक्सिंग’ स्पर्धेत तिने सुवर्णपदकही पटकावले आहे. ‘कष्ट करून मोठी होणार’, असा मुलीचा मनोदय होता आणि ती शिक्षणातही हुशार आहे. संशयित युसूफ तिच्या शेजारीच रहात होता. त्याच्याकडे ती वडिलांप्रमाणे पहात होती आणि म्हणूनच त्याला ती ‘अंकल’ (काका) अशी हाक मारायची; मात्र हा ‘काका’च एक दिवस आपला काळ ठरेल असे पीडित युवतीने स्वप्नातही पाहिले नव्हते. अखेर त्यानेच तिचा घात केला. या घटनेविषयी प्रसारमाध्यमाशी बोलतांना पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांचेही डोळे पाणावले. पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी म्हणाले, ‘‘ही घटना अतिशय किळसवाणी आहे. गरिबीचा अपलाभ अशा प्रकारे कुणीही घेऊ नये.’’ युवतीने धाडस दाखवून युसूफचा प्रतिकार केल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
घटनेची पुनरावृत्ती झाल्यास चोख प्रत्युत्तर देऊ ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची चेतावणी
म्हापसा – युवतीवरील लैंगिक अत्याचाराचा विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी तीव्र निषेध केला आहे. अशा घटनेची पुनरावृत्ती झाल्यास त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाणार असल्याची चेतावणी या संघटनांनी दिली आहे. म्हापसा पोलिसांनी या प्रकरणी त्वरित कारवाई केल्याने हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी म्हापसा पोलिसांचे अभिनंदन केले आहे.