इतिहास संकलन समितीच्या रत्नागिरी जिल्हा शाखेची स्थापना : अध्यक्षपदी डॉ. प्रा. रमेश कांबळे
चिपळूण – येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरात नुकतीच इतिहास संकलन समितीची सभा झाली. या वेळी समितीच्या रत्नागिरी जिल्हा शाखेची स्थापना घोषित करण्यात आली असून अध्यक्षपदी डॉ. प्रा. रमेश कांबळे यांची निवड झाली आहे. या सभेला समितीचे कोकण प्रांत सहसचिव प्रशांत रावदेव, कोषाध्यक्षा श्रीमती रजनी अग्रवाल, महिला प्रमुख श्रीमती हेमा तन्ना आदी मुंबईहून उपस्थित राहिले.
या सभेला चिपळूण परिसरातील माध्यमिक शाळेत इतिहास शिकवणार्या शिक्षकांनाही निमंत्रित करण्यात आले होते. युनायटेड इंग्लिश स्कूलचे माजी मुख्याध्यापक मधुसूदन केतकर यांनी चिपळूण तालुक्यात शिवसाम्राज्यदिनाच्या स्पर्धांचे आयोजन कसे करता येईल ? याचे मार्गदर्शन केले. ‘अधिकाधिक शालेय विद्यार्थ्यांना या स्पर्धांत सहभागी करूया’, असे आवाहन त्यांनी केले. तालुक्यातील शाळांत इतिहास शिकवणारे शिक्षक सौ. मेधा लोवेलेकर, सौ. श्वेता चव्हाण, आशिष मांडवकर आणि अभिजित देशमाने उपस्थित होते.
या वेळी श्रीमती हेमा तन्ना यांनी इतिहास संकलन समितीच्या कामकाजाची माहिती दिली. यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत. छत्रपती हे भारतियांच्या आदराचे स्थान आहे. यावर्षी समिती महाराजांच्या चरित्र आणि चारित्र्याचा उद्घोष करणार आहे. यासाठी सर्व शाळा आणि महाविद्यालयांतून व्याख्याने अन् विविध स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया, असे आवाहन या वेळी करण्यात आले. समितीचे उपाध्यक्ष डॉ. विजय कुलकर्णी यांनी आभार मानले.
इतिहास संकलन समितीची जिल्ह्याची उर्वरित कार्यकारिणी !
उपाध्यक्ष – प्राचार्य डॉ. विजय कुलकर्णी (खेड) आणि इतिहासाच्या प्राध्यापिका सौ. रश्मी आडेकर (खरे ढेरे महाविद्यालय गुहागर), सचिव – प्रा. विकास मेहंदळे (तात्यासाहेब नातू महाविद्यालय मार्गताम्हाने), सहकार्यवाह – प्रा. पंकज घाटे (गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी), कोषाध्यक्ष – धीरज वाटेकर (चिपळूण), कार्यकारिणी सदस्य – प्रा. विजय हटकर (लांजा), प्रा. सुनील जावीर (सावर्डे), प्रा. जयवंत पाताडे (खेड), प्रा. प्रसाद भागवत (शृंगारतळी), प्रा. अरविंद कुलकर्णी (देवरुख). संपर्क प्रमुख विनायक ओक (चिपळूण) असून समितीचे जिल्हा कार्यालय लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर असणार आहे.