मुंबईचे शिल्पकार आणि आधुनिकतेचा पाया घालणारे जगन्नाथ शंकरशेठ !
३१ जुलै २०२३ या दिवशी मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ शंकरशेठ यांचा स्मृतीदिन आहे. त्या निमित्ताने…
१० फेब्रुवारी १८०३ या दिवशी जन्माला आलेले जगन्नाथ शंकरशेठ यांनी मुंबईचे स्वरूप पालटून त्या ठिकाणी आधुनिक मुंबई शहराची पायाभरणी केली. म्हणूनच ‘मुंबईचे शिल्पकार’ म्हणून त्यांचे यथार्थ वर्णन केले जाते. जगन्नाथ शंकरशेठ यांचा, म्हणजेच नानांचा पूर्ण जीवनक्रम अतिशय प्रेरणास्पद आणि अभिमानास्पद आहे.
१. नानांचे पूर्वज
१६६८ या वर्षी ‘ईस्ट इंडिया कंपनी’ने इंग्लंडच्या राजाकडून मुंबई बेट भाड्याने घेतले आणि सुरतऐवजी मुंबईहून स्वतःचा व्यापार ते करू लागले. पुढे मुंबईच्या इंग्लिश व्यापार्यांच्या जोडीने अन्य भागांतील भारतीय व्यापारीसुद्धा तेथे येऊन व्यापार करू लागले. या व्यापार्यांमध्ये बाबुलशेठही होते. हे बाबुलशेठ म्हणजेच नाना शंकरशेठ यांचे आजोबा होत. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड हे त्यांचे मूळ गाव होते. मुरकुटे हे त्यांचे कुलनाम. हे घराणे जातीने दैवज्ञ ब्राह्मण, म्हणजे सोनार होते. बाबुलशेठ यांनी त्यांचा मुलगा शंकरशेठ याला जवाहिरांची आणि सावकारीने पैसे व्याजाने देण्याची पेढी उघडून दिली. ‘वर्ष १८०० मध्ये शंकरशेठ यांच्या तिजोरीत १६ लाख रुपये रोख आणि २ लाख रुपयांचे जडजवाहीर होते’, असे म्हणतात. यावरून त्यांच्या श्रीमंतीचा अंदाज येऊ शकतो.
जगन्नाथ यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शंकरशेठ आणि आईचे नाव भवानीबाई. त्यांचे आडनाव मुरकुटे असले, तरी पुढे शंकरशेठ हेच त्यांच्या वंशजांचे आडनाव झाले. जगन्नाथ वडिलांच्या कामधंद्यात साहाय्य करू लागले; परंतु वर्ष १८२२ मध्ये नाना १९ वर्षांचे असतांनाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांची आई ते ४ वर्षांचे असतांनाच देवाघरी गेली होती. अतिशय लहान वयातच नानांना सर्व कामकाजात पूर्ण लक्ष घालावे लागले.
२. शिक्षणविषयक कार्य
नानांना शिक्षणाचे महत्त्व पुरेपूर पटले होते. त्यांना जरी मास्तरांनी घरी येऊन शिकवले असले, तरी अनेकांना ‘शिक्षण ही सहज उपलब्ध होणारी गोष्ट नाही’, हे त्यांनी निरीक्षणातून जाणले होते. त्यामुळे लहान वयातच नानांनी शिक्षणप्रसाराचे कार्य करण्याचे ठरवले.
वर्ष १८१९ मध्ये माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे मुंबई परिसराचे गव्हर्नर झाले. त्यांची आणि नानांची ओळख झाली. एल्फिन्स्टन यांच्या शिक्षणविषयक योजनांमध्ये नानांनी त्यांना साहाय्य करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसारच २१ ऑगस्ट १८२२ या दिवशी मुंबईची ‘हैंदशाळा’ आणि ‘शाळा पुस्तक मंडळी’, या संस्थेची स्थापना झाली. याच संस्थेचे नाव पालटून ‘नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’ असे झाले. शाळा उघडल्या. त्यानंतर महाविद्यालये उघडण्यासाठी निधी उभारला. ‘एल्फिन्स्टन कॉलेज’, ‘ग्रँड मेडिकल कॉलेज’, ‘पेरी प्रोफेसरशिप ऑफ ज्युरिस्प्रूडन्स’ नावाचे कायद्याचे कॉलेज, भारतातील पहिले ‘सर जीजीभाय जमशेदजी स्कूल ऑफ आर्ट’ हे चित्रकलेचे कॉलेज स्थापन झाले. अशा प्रकारे त्यांनी जवळपास सगळ्या तर्हेचे शिक्षण देण्याची सोय मुंबईत केली. वर्ष १८४५ मध्ये ‘स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी’ या संस्थेची स्थापना केली आणि स्वतःच्या घरात मुलींसाठी शाळा काढली. घरोघरी फिरून मुलींच्या शिक्षणाविषयीचे अपसमज आणि शाळेला होणारा विरोध त्यांनी दूर केला.
पुण्यातील एक संस्कृत पाठशाळा बंद करण्याचे ठरत होते, तेव्हा नानांनी त्याला विरोध करून ती पाठशाळा बंद होण्यापासून वाचवली आणि तिचे दायित्व स्वतःकडे घेतले. नानांचे मराठी, संस्कृत आणि इंग्रजी भाषांवर प्रभुत्व होते. संस्कृत भाषेवर त्यांचे नितांत प्रेम होते; म्हणूनच त्यांच्यानंतर त्यांच्या मुलाने मुंबई विभागात शालांत परीक्षेत संस्कृत भाषेत पूर्ण गुण मिळवणार्याला ‘जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती’ चालू केली. आजही ती शिष्यवृत्ती १० वीच्या वर्गात संस्कृत भाषेमध्ये पूर्ण गुण घेणार्याला दिली जाते.
३. सामाजिक आणि धार्मिक कार्य
नानांनी हिंदु समाजाला स्मशानभूमी मिळावी, यासाठी स्वतःची भूमी दान केली. अनेक मंदिरांना दान दिले. धर्मांतराविरुद्ध ठिकठिकाणी निषेध सभा घेऊन समाजात जागृती केली आणि आपल्या स्थानाचा अन् प्रतिष्ठेचा योग्य तो वापर करून नानांनी इंग्रज राज्यकर्त्यांचा हस्तक्षेप करून धर्मांतराचे कार्य थांबवण्यास भाग पाडले.
४. मुंबईत केलेल्या सुधारणा
मुंबई शहरात ज्या भागात इंग्लिश लोक रहात असत, त्याच भागात सुधारणा होत असे. वर्ष १८३४ मध्ये जेव्हा नाना मुंबईच्या कौन्सिलमध्ये निवडून आले, तेव्हापासून त्यांनी इतर भागातही सुधारणा करण्यास प्रारंभ केला. रस्ते चांगले केले, स्वच्छता वाढवली, रस्त्यावर गॅसबत्तीची सोय केली, भुयारी गटारे केली, पोलिसांचा चोरांवर वचक निर्माण केला. एकूण १६ वर्षे नाना निवडून येत होते. मुंबईत स्त्रियांसाठी पहिले प्रसुतीगृह बांधले. ‘शंकरशेठ’ यांच्या नावाने धर्मार्थ दवाखाने चालू केले. बाल-गुन्हेगार आपल्या पायावर कसे उभे राहू शकतील ? यासाठी प्रयत्न केले. दत्तक मुलांना कायदेशीर संरक्षण दिले. जुगार-सट्टा यांच्यावर बंदी घालणारा कायदा केला. देशी वकिलांना दुर्लक्षित करण्याचे इंग्रज सरकारचे धोरण मोडून काढले.
‘राणीची बाग’ आणि ‘अल्बर्ट म्युझियम’ या दोन्हीच्या स्थापनेचे श्रेय नानांकडेच जाते. मर्कंटाईल बँक, सेंट्रल बँक ऑफ वेस्टर्न इंडिया यांसारख्या बँकांच्या उभारणीतही नानांचा मोलाचा सहभाग होता. १६ एप्रिल १८५३ या दिवशी आशियातील पहिली रेल्वे बोरीबंदर (आजचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते ठाणे अशी धावली. या रेल्वेसाठी नानांनी केलेले प्रयत्न मोलाचे आहेत. या पहिल्या रेल्वे प्रवासात जे काही मोजके मान्यवर होते, त्यात नानांचा समावेश होता. या आणि अशा अनेक सर्व सुधारणांमुळे नानांना ‘मुंबईचे शिल्पकार’ म्हटले जाते, ते यथार्थ आहे.
५. राजकीय कार्य
वर्ष १८५१ मध्ये ‘बाँबे असोसिएशन’ नावाची पश्चिम भारतातील पहिली राजकीय संस्था स्थापन झाली. ‘भारतियांच्या समस्या इंग्लंडपर्यंत पोचाव्यात’, हा या संस्थेचा उद्देश होता. या संस्थेचे ‘प्रतिष्ठित अध्यक्ष’ म्हणून जमशेदजी जीजीभाई आणि ‘अध्यक्ष’ म्हणून जगन्नाथ शंकरशेठ यांना निवडले.
६. नानांचे स्मारक
३१ जुलै १८६५ या दिवशी नानांनी स्वतःची जीवनयात्रा संपवली. त्यांच्या कार्याविषयीची कृतज्ञता म्हणून गिरगाव येथील एका मार्गाला ‘जगन्नाथ शंकरशेठ’ यांचे नाव दिले आहे. गावदेवी भागातील गोवालिया टँकजवळील एका चौकास नानांचे नाव दिले आहे (नाना चौक). छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकाच्या बाहेर नानांचा पुतळा आहे. अशा तर्हेने मुंबई नगरीत, मुंबई परिसरात आणि पर्यायाने भारतभरात आधुनिकतेचा पाया घालण्याचे काम जगन्नाथ शंकरशेठ यांनी केले. नानांनी जे काही भरीव कार्य केले आहे, त्या कार्याला तोड नाही.
– डॉ. (सौ.) वीणा गानू, नागपूर.
(साभार : त्रैमासिक ‘प्रज्ञालोक’, जुलै ते सप्टेंबर २०२३)