पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्यासाठी ५ सहस्र पोलिसांचा बंदोबस्त !
पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्ट या दिवशी पुण्यात येणार असल्याने शहरात कडक बंदोबस्त ठेवला आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेचे दायित्व असलेले विशेष सुरक्षा पथक (एस्.पी.जी), ‘फोर्स वन’चे सैनिक अशा एकूण ५ सहस्र पोलिसांचा बंदोबस्त आहे. पंतप्रधान मोदी यांना ‘लोकमान्य टिळक’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच पंतप्रधान विविध विकासकामांचेही उद़्घाटन करणार आहेत. या सर्व कार्यक्रमांच्या पोलीस बंदोबस्ताची आखणी पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, विशेष शाखेचे उपायुक्त आदींनी केली आहे, तर ‘परिमंडळ १’चे पोलीस उपायुक्त मध्यभागातील बंदोबस्ताचे दायित्व सांभाळणार आहेत. पुरस्कार वितरण सोहळा आणि विकासकामांचे उद़्घाटन या व्यतिरिक्त पंतप्रधान मोदी ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति मंदिरा’त दर्शनासाठी जाणार आहेत. या सर्व प्रवासात वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये; म्हणून शहरातील वाहतूक व्यवस्थेत पालट केला आहे.