महाराष्ट्रात आढळले १ सहस्र ६६४ बनावट सीमकार्ड !
|
मुंबई, ३० जुलै (वार्ता.) – बनावट सीमकार्डद्वारे होणार्या सायबर गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. बनावट सीमकार्ड वापरून आर्थिक लूट केल्याप्रकरणी महाराष्ट्रात १८ गुन्हे नोंदवण्यात आले असून यामध्ये तब्बल १ सहस्र ६६४ बोगस सीमकार्ड वितरीत करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये ४६ आरोपी असून त्यातील २५ जणांना अटक करण्यात आली आहे. ही गंभीर माहिती गृहविभागाकडून विधानसभेत देण्यात आली आहे. काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी याविषयी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर ही माहिती सभागृहाला देण्यात आली आहे.
या प्रकरणी राज्याच्या पोलीस महासंचालकांनी ७ जुलै २०२३ या दिवशी परिपत्रक काढून बनावट सीमकार्डविषयी कोणते गुन्हे नोंदवले असल्यास त्याविषयीची माहिती देण्याची सूचना सर्व पोलीस ठाण्यांना दिली होती. सायबर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेली सीमकार्ड ‘ब्लॉक’ करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या भारतीय सायबर क्राईम समन्वय केंद्राकडून ‘ऑनलाईन पोर्टल’ चालू करण्यात आले आहे.