स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांमुळे नातेवाइकांशी जवळीक साधता न येणे; परंतु साधना म्हणून प्रयत्न केल्यावर न्यूनता स्वीकारून नातेवाइकांशी जवळीक साधता येणे
१. नातेवाइकांविषयी पूर्वग्रह असल्यामुळे त्यांच्याशी जवळीक साधता न येणे : ‘भूतकाळात घडलेल्या काही प्रसंगांमुळे मला नातेवाइकांशी जुळवून घ्यायला अडचण येत होती. त्यांच्याविषयीच्या पूर्वग्रहामुळे माझ्या मनात त्यांच्याविषयी नकारात्मक विचार येऊन मला त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलता येत नव्हते. परिणामी मला त्यांच्याशी जवळीक साधता येत नव्हती.
२. नातेवाइकांविषयी असलेले पूर्वग्रहाचे विचार दूर होण्यासाठी साधना म्हणून प्रयत्न करणे : एकदा आमचे नातेवाईक सहलीला जाणार होते. मी नेहमीप्रमाणे त्यांच्या समवेत जायला नकार दिला. त्यानंतर मला वाटले, ‘मी साधना करते, तर माझ्या मनातील त्यांच्याविषयीचे पूर्वग्रहाचे विचार दूर व्हायला हवेत. मला पालटायला हवे. देवाने माझ्यातील स्वभावदोष दूर करण्यासाठी ही संधी दिली आहे.’ त्यामुळे माझ्या मनाची सिद्धता झाली. मी कुटुंबियांच्या समवेत मनमोकळेपणाने बोलले आणि सहलीला गेले. माझ्या मनातील त्यांच्याविषयीचे पूर्वग्रहाचे विचार दूर होऊन मला त्यांच्याशी जवळीक साधता आली.
३. न्यूनता घेतल्याने नातेवाइकांशी मनमोकळेपणाने बोलता येणे आणि ‘प्रतिमा जपणे’ हा स्वभावदोष न्यून होण्यास साहाय्य होणे : माझ्या मनात ‘पूर्वी माझी नातवाइकांशी जवळीक नव्हती आणि आता मी त्यांच्यामध्ये मिसळले, तर त्यांना काय वाटेल ?’, असा प्रतिमेचा विचार येत असे; परंतु नंतर गुरुकृपेने मला न्यूनता घेता आली आणि कुटुुंबियांशी मनमोकळेपणाने बोलता आले. ‘हे केवळ साधना केल्यामुळे शक्य झाले’, असे मला वाटते. त्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. अभया उपाध्ये, कामोठे, जि. रायगड. (३०.११.२०२२)