सिंधुदुर्ग : महावितरणच्या इन्सुली उपकेंद्रात बिघाड झाल्याने २५ गावे अंधारात !

बिघाड दुरुस्त करून टप्याटप्याने वीजपुरवठा होणार ! – महावितरण

(प्रतिकात्मक चित्र)

सावंतवाडी – महाराष्ट्र राज्य वीज वितरण आस्थापनाच्या (महावितरणच्या) इन्सुली उपकेंद्रात बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित होऊन बांदा शहरासह सावंतवाडी तालुक्यातील २५ गावे २७ जुलैच्या मध्यरात्रीपासून अंधारात आहेत. येथे झालेला बिघाड दुरुस्त करण्यात येत असून टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती महावितरणचे उपकार्यकारी अभियंता के.एच्. चव्हाण यांनी दिली.

या उपकेंद्रातून बांदा शहर आणि आजूबाजूच्या २४ गावांना ३३/११ के.व्ही. या उच्चदाबाच्या वीजवाहिनीतून वीजपुरवठा करण्यात येतो. २७ जुलै या दिवशी मध्यरात्री उपकेंद्रात शॉर्टसर्किट होऊन आग लागली आणि स्फोट झाला. यामुळे वीजवितरण यंत्रणा ठप्प झाली. उपकेंद्रातील बिघाड दूर करण्यासाठी महावितरणचे २५ हून अधिक कर्मचारी आणि अभियंता काम करत आहेत.

तांबोळी गावातील विजेची समस्या ४ दिवसांत मार्गी लागणार

गेला एक मास विजेच्या समस्यांनी तांबोळी ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी ४ दिवसांपूर्वी सरपंच वेदिका नाईक यांच्या नेतृत्वाखाली बांदा येथील महावितरण कार्यालयात जाऊन अधिकार्‍यांना खडसावले होते. ‘ग्रामस्थ येत आहेत, हे समजल्यावर साहाय्यक अभियंता अनिल यादव कार्यालयातून पसार झाले’, असा आरोप त्या वेळी ग्रामस्थांनी केला होता. ते साहाय्यक अभियंता यादव २९ जुलै या दिवशी तांबोळी ग्रामपंचायत कार्यालयात गेले आणि त्यांनी ‘येत्या ४ दिवसांत गावातील विजेची समस्या मार्गी लावू’, असे आश्वासन दिले.